बोंडअळीच्या आक्रमणाने बीटी कपाशीची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 10:25 PM2017-10-02T22:25:23+5:302017-10-02T22:25:46+5:30
बीटी कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही, बोंडअळी पडणार नाही, अशी खात्री देत कंपन्यांनी सदर वाणाची निर्मिती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : बीटी कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही, बोंडअळी पडणार नाही, अशी खात्री देत कंपन्यांनी सदर वाणाची निर्मिती केली. काही वर्षे कंपन्यांचा दावा खरा ठरला; पण मागील वर्षीपासून बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. यंदाही बीटी बोंडअळीने कपाशीची चाळणी केली आहे. अपेक्षित उत्पन्न होत नसल्याने शेतकºयांची चिंता मात्र वाढली आहे.
नॉन बीटी कपाशी बियाण्यांवर रोगांचा प्रादुर्भाव लवकर होतो. आलेली पाती गळून जाते. उत्पादनात मोठी घट येते. यामुळे शेतकºयांनी घरची सरकी गाळून तिचा बियाणे म्हणून वापर करण्याला सोडचिठ्ठी देत शासन व कंपन्यांच्या जाहीरातबाजीला बळी पडत महागडे बीटी कपाशी बियाणे वापरण्याची मानसिकता केली. ही बाब हेरून धर्मा, राशी, भक्ती, विठ्ठल, अजीत अशा नानाविध कंपन्यांनी बीटी बियाण्यांची निर्मिती केली. उत्पादन खर्च ५०० च्या आत असला तरी कृषी विभागाच्या अधिकाºयांना चिरीमीरी देत एमआरपी ९५० पर्यंत वाढवून घेतली. दोन वर्षांपूर्वीपर्यंत शेतकºयांनी ४५० ग्रॅम बियाण्यांसाठी ९५० रुपये मोजले. ही बाब शेतकºयांची लूट करणारी असल्याचे उशीरा लक्षात आल्याने शासनाने कंपन्यांना भाव कमी करण्याची विनंती केली. कंपन्यांनी विनंती अमान्य केल्यावर शासकीय बडगा उगारून बियाण्यांचे भाव ७०० ते ७५० रुपयांवर आणले. भाव अधिक असले तरी फवारणीचा खर्च कमी येणार व रोग प्रतिकारक शक्ती बºयापैकी असल्याने राज्यातील समस्त शेतकºयांनी सर्व वाणांना दूर सारत बीटी बियाण्यांचा वापर केला. आता मात्र या वाणाच्या कपाशीवर सर्वच प्रकारचे रोग येत आहे.
पांढरी माशी व बोंडअळी यांना हे वाण मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. कंपनीकडे विचारणा केली असता ते आता या वाणातील ‘सिन्ड्रोम’ कमजोर झाला. किडींची प्रतिकार शक्ती वाढली. यामुळे आम्ही काही करू शकत नाही, असे म्हणून हात झटकत आहे. यंदा कपाशी समाधानकारक दिसत असली तरी केवळ झाडांची केवळ वाढ झाली आहे. बोंडाची संख्या नगण्य आहे. पांढरी माशी व बोंडअळीच्या परिणामाने पाती, फुल व बोंडे गळत आहे. परिणामी, उत्पादनात मोठी घट येणार आहे. उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्नवाढ यापेक्षा उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्नही कमी हे सूत्र स्वीकारून शेतकºयांना लाभ देण्याकरिता शासनाने प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.
अन्यथा बियाणे कंपन्यांचे परवाने रद्द करावे
बियाण्यांतील रोगप्रतिकारक घटक कमजोर झाला असेल तर नवीन संशोधन करून रोगांना बळी न पडणारे वाण कंपन्यांनी बाजारात आणणे गरजेचे होते; पण असे न करता जुन्याच तंत्रज्ञानाने बियाणे तयार करून शेतकºयांना लुटण्याचे धोरण कंपन्यांनी स्वीकारले आहे. शासनाने भाव कमी करण्यासाठी दबाव तंत्र वापरले. आता कंपन्यांनी रोगांना बळी न पडणारे बियाणे रास्त भावात निर्माण करण्यासाठी दबाव टाकावा. अन्यथा परवाने रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.