बीटी कपाशीवर बोंड अळीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:06 AM2017-08-07T00:06:26+5:302017-08-07T00:06:56+5:30
कपाशीचे पीक फुलांवर आले असताना त्यावर गुलाबी बोंड अळीने हल्ला केल्याचे कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कपाशीचे पीक फुलांवर आले असताना त्यावर गुलाबी बोंड अळीने हल्ला केल्याचे कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. हा प्रादुर्भाव सध्या अल्प असला तरी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान त्याच्या वाढण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकºयांना या अळीची ओळख गरजेची आहे. गुलाबी बोंडअळीने बीटी कपाशीसाठी लागणारी प्रतिकारक क्षमता गत दोन -तीन वर्षांत स्वत:मध्ये विकसित केल्याचे दिसते. याच्या प्रमुख कारणापैकी एक म्हणजे बीटीची लागवड करताना या बियाण्यांबरोबर नॉन बीटी बियाणे येत असतात. बहुतेक शेतकरी ते फेकून देतात; परंतु या बियाण्याची चहूबाजूने लागवड केल्यास बोंडअळीचे व्यवस्थापन सोपे जात असल्याचे कृषी विभागकडून कळविण्यात आले आहे.
गुलाबी बोंड अळीची ओळख
अंड्यातून निघालेली अळी रंगाने पांढुरकी तर पूर्ण वाढ झालेली अळी गुलाबी रंगाची असून आकाराने मोत्यासारखी आहे. या गुलाबी बोंडअळीची अंडी कपाशीच्या फुले, बोंड, देठ व कोवळ्या पानाच्या खाली असतात.
अळीच्या प्रादुर्भावामुळे ‘डोमकळी’
ही अळी फुले व हिरव्या बोंडना नुकसान पोहचते. ज्या फुलांमध्ये ही अळी असते, अशी फुले अर्धवट उमलेल्या गुलाबच्या कळीसारखी दिसतात यालाच ‘डोमकळी’ अवस्था म्हणतात.
या अळीचा प्रादुर्भाव बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर हे छिद्र बंद होते. त्यामुळे बोंडाचे वरुन निरीक्षण केल्यानंतर सुद्धा या अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही.
आर्थिक नुकसानीची पातळी
कामगंध सापळ्यामध्ये सरासरी ८ ते १० नर पंतग सतत दोन ते तीन दिवस आढळून येणे किंवा ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त फुले व बोंड आढळून येते.
अळीच्या व्यवस्थापनाकरिता शेतकºयांनी करावयाच्या उपाययोजना
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा अझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम १० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, शेतामध्ये गुलाबी बोंडअळीच्या नर पतंगाना आकर्षित करणारे प्रति हेक्टरी ४ ते ५ कामगंध सापळे लावावे. कपाशी शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी किमान १० पक्षी थांबे उभारावे म्हणजेच पक्षी त्यावर बसवून शेतातील अळ्या टिपून खातील.