देवळी-नांदोरासह हिंगणी -बोरधरण मार्गावर नवीन पूल बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 06:00 AM2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:13+5:30
खा. रामदास तडस यांनी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याकरिता समन्वय आढावा बैठक बोलावली होती. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय मंत्री, शाखा अभियंता वाघमारे, राज्य परिवहन महामंडळाचे चेतन हासबनीस आदींची उपस्थिती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने गावांना जोडणारे पूल व रस्ते अनेक ठिकाणी क्षतिग्रस्त झाले आहेत. या परिस्थितीमुळे बस फेऱ्या प्रभावित होवून विद्यार्थीवर्गाचेही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवळी तालुक्यातील देवळी-नांदोरा व सेलू तालुक्यातील हिंगणी-बोरधरण मार्गावरील पूल क्षतिग्रस्त झाल्याने नागरिकांची समस्या लक्षात घेता तेथे नवीन पूल बांधण्यात यावे, अशा सूचना खा. रामदास तडस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
खा. रामदास तडस यांनी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याकरिता समन्वय आढावा बैठक बोलावली होती. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय मंत्री, शाखा अभियंता वाघमारे, राज्य परिवहन महामंडळाचे चेतन हासबनीस आदींची उपस्थिती होती.
देवळी-नांदोरा या प्रमुख जिल्हा मार्गावर उभा असलेला पूल क्षतिग्रस्त झाल्याने अनेक बसफेऱ्या प्रभावित होऊन विद्यार्थी वर्गाच्या दळण वळणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थी वर्गाला त्रास होऊ नये म्हणून बसफेºया पर्यायी मार्गाने सोडण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
क्षतिग्रस्त झालेल्या पुलाच्या दुरूस्तीचे कार्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुरू झाले असून सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णत: बंद करून अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम २०१९ वर्षाच्या अर्थसंकल्पीय यादीत मंजूर झाले आहे. तांत्रिक बाबी व निविदा प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ नवीन पुलाचे कार्य प्रारंभ करावे, अशा सूचना खासदार रामदास तडस यांनी दिल्या.
सेलू तालुक्यातील बोरधरण-हिंगणी मार्गावरील बोरी कोकाटे गावाजवळील पूल क्षतिग्रस्त झाला आहे. त्याठिकाणी देखील तात्काळ नवीन पूल बांधकामाचे कार्य प्रारंभ करावे. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण भरलेले आहे. येत्या काळात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील पोलीस विभागाने सतर्क राहून सर्व विभागांनी समनव्यातून कार्य करावे, असे आवाहनही याप्रसंगी खा. रामदास तडस यांनी केले.