मुदत संपूनही इमारत बांधकाम सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:13 PM2019-02-28T22:13:07+5:302019-02-28T22:14:09+5:30
सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे काम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. कराराप्रमाणे या इमारत बांधकामाचा कालावधी संपल्यानंतरही काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ही इमारत कधी पूर्णत्वास जाईल, असा प्रश्न उपस्थित होते आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे काम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. कराराप्रमाणे या इमारत बांधकामाचा कालावधी संपल्यानंतरही काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ही इमारत कधी पूर्णत्वास जाईल, असा प्रश्न उपस्थित होते आहे.
सेलू येथे ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामसाठी ३४९.१५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून धुमधडाक्यात ३० मार्च २०१३ ला बांधकामाला सुरुवात झाली. कामाची गती पाहून कंत्राटदाराशी केलेल्या करारानुसार ३० एप्रिल २०१४ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्तविल्या जात होता. पण, या एक वर्षाच्या कालावधीत केवळ सुरक्षा भिंतच उभी राहिली. दोष दुरुस्ती असलेला २४ महिन्यांचा कालावधीत या इमारतीचे अर्धेही काम पूर्ण झाले नाही. तालुक्यातील रुग्णांना तत्काळ सेवा देता यावी म्हणून बांधकामास मंजुरी देण्यात आली. कोट्यवधींचा निधीही दिला, परंतु सहा वर्षांत ही इमारत पूर्णत्वास गेली नसल्याने आरोग्य सेवेविषयी शासकीय यंत्रणा किती उदासिन आहे, हे लक्षात येते. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
या इमारतीचे सहा वर्षांपासून बांधकाम सुरू आहे. काम कासवगतीने असले तरी कंत्राटदाराकडून बांधकामावर पुरेसे पाणी दिले जात नसल्याची ओरड होत आहे. पावसाचेच पाणी या इमारतीच्या बांधकामाकरिता पूरक ठरले आहे. परिणामी बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच सुरक्षा भिंंतीला जागोजागी गेलेले तडे निकृष्ट कामाचा परिचय करुन देत आहे. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर ही भिंत या इमारतीची किती वर्ष सुरक्षा करेल, हे सांगणे कठीण आहे.