वर्धा पालिकेत बांधकाम परवानगी झाली आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:23 AM2017-12-23T00:23:03+5:302017-12-23T00:24:19+5:30

राज्यातील सर्वच नगर परिषदांना शासन स्तरावरून माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून बांधकाम परवानगी बीपीएमएस या प्रणालीद्वारे करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Building permission in Wardha Municipal was made online | वर्धा पालिकेत बांधकाम परवानगी झाली आॅनलाईन

वर्धा पालिकेत बांधकाम परवानगी झाली आॅनलाईन

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यातील पहिली नगर परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यातील सर्वच नगर परिषदांना शासन स्तरावरून माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून बांधकाम परवानगी बीपीएमएस या प्रणालीद्वारे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या निर्देशानुसार वर्धा पालिकेमार्फत दोन महिन्यांपासून बीपीएमएस प्रणाली नगर रचना अधिनियम १९६६ प्रमाणे कार्य करते का, याची चाचणी सुरू होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर वर्धा नगर परिषदेने आॅनलाईन बीपीएमएस प्रणालीद्वारे बांधकाम परवानगी दिली. हा मान मिळविणारी वर्धा नगर परिषद राज्यातील पहिली ठरल्याची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी दिली.
बीपीएमएस प्रणालीमध्ये नागरिकांना आर्कीटेक्ट मार्फत बांधकाम परवानगीचा नकाशा सॉफ्टकॉपी मध्ये आॅनलाईन सादर करावा लागतो. बांधकाम परवानगी संबंधीत इतर माहिती व बांधकाम परवानगी शुल्क आॅनलाईन सादर करावे लागतात. सदर प्रणालीमार्फत नागरिकांना बांधकाम परवानगी दाखल करताना प्रस्तावमध्ये नगर रचना अधिनियम १९६६ प्रमाणे काही त्रूटी असल्यास बीपीएमएस प्रणाली नागरिकांना आधीच त्रूटी लक्षात आणून देते. जोपर्यंत प्रस्तावातील सर्व त्रूटी दूर होत नाही तोपर्यंत आॅनलाईन दाखल होत नाही. नगर परिषदेमार्फत बांधकाम परवानगीची पडताळणी झाल्यानंतर नागरिकांना त्यांच्या घरी संगणकावर बांधकाम परवानगी मिळेल. या आधी नागरिकांना बांधकाम परवानगीकरिता नगर परिषदेकडे अर्ज सादर करून प्रस्तावामध्ये त्रूटी असल्यास नगर परिषदेचे खेटे घ्यावे लागत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये मनस्ताप व घरबांधणीकरिता गृहकर्ज घेणाºया नागरिकांना विलंबास सामोरे जावे लागत होते.
आॅनलाईन बांधकाम परवानगीमुळे बांधकाम परवानगी प्रक्रिया सोयी, सुविधेची व नागरिकांच्या वेळेची बचत करणारी होईल, असे मत नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी व्यक्त केले. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर व सर्व नगर सेवकांनी नगरपालिका प्रशासनाच्या ई गर्व्हनन्सच्या वाटचालीकरिता प्रशंसा केली आहे.
बांधकाम परवानगी आॅनलाईन बीपीएमएस प्रणालीमार्फत देण्याकरिता मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मुख्याधिकारी यांनी नगर अभियंता सुधीर फरसोले, नगररचनाकार चुन्नीला झाडे, सहा. नगर रचनाकार दिनेश नेरकर, संगणक अभियंता अनुप अग्रवाल, महाआयटीचे संगणक अभियंता बिपीन गोटेकर यांनी उत्कृष्ट कार्य केले.
अतिक्रमण हटविलेल्या जागांवर जॉगींग ट्रॅक
शहरातील सर्व चाळीस खुल्या जागांवरील अतिक्रमण काढण्यात येत आहे. या जागा घाणीच्या साम्राज्यातून मुक्त करण्यासाठी कायम स्वरूपी व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी वैशिष्टपूर्ण निधीतून ६ कोटी रुपये मंजूर केले आहे. या मोकळ्या केलेल्या जागेवर कायमस्वरूपी कुंपण, विद्युत व्यवस्था, जॉगींग ट्रॅक, पाणी व्यवस्था होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष तराळे यांनी दिली.
या कामाची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लवकरच कामे सुरू केली जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच शहरातील एकमेव जलतरण तलावाचे संपूर्ण नूतनीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा फिल्टर प्लँट व त्या परिसराच्या विकासाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी ६० लक्ष रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
ट्राफिक सिग्नलची व्यवस्था होणार
अल्पसंख्याक निधी अंतर्गत १.५ कोटीची कामे शहरात केली जात आहे. तसेच नगरोत्थान निधी अंतर्गत १.२४ कोटीची कामे ही होणार आहे. दलित वस्ती विकास निधी अंतर्गत २.७० कोटींची कामे शहरातील वाहतूक व्यवस्था ट्राफिक सिग्नल, विद्युत व्यवस्था सुधारणेसाठी करण्यात येणार आहे.

Web Title: Building permission in Wardha Municipal was made online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.