सामूहिक शेततळे अन् सोलरपंप ठरले भरभराटीचे साधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:02 PM2018-11-12T23:02:27+5:302018-11-12T23:02:50+5:30
सन २०१५ चा आॅक्टोबर महिना. पावसाच्या कमतरतेमुळे मदनी या गावातील शेतकऱ्याने १५ एकर सोयाबीनवरून नांगर फिरवला. या घटनेमुळे जिल्ह्यातील कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली होती; पण त्याच शेतकऱ्यासाठी २०१८ चा आॅक्टोबर महिना सुखद ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सन २०१५ चा आॅक्टोबर महिना. पावसाच्या कमतरतेमुळे मदनी या गावातील शेतकऱ्याने १५ एकर सोयाबीनवरून नांगर फिरवला. या घटनेमुळे जिल्ह्यातील कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली होती; पण त्याच शेतकऱ्यासाठी २०१८ चा आॅक्टोबर महिना सुखद ठरत आहे. आज त्यांच्या शेतात १५ एकरवर फळबाग बहरली आहे. केवळ एका पावसामुळे नांगर फिरवावा लागणाऱ्या त्यांच्या शेतीत ही किमया केली ती सामूहिक शेततळे आणि सोलरपंपाने.
वर्धा तालुक्यातील मदनी गावातील माधव वानखेडे या शेतकऱ्यांकडे २५ एकर शेती जिराईत होती. २०१५ मध्ये जिल्ह्यात कोरडा दुष्काळ होता. त्या दुष्काळाचा फटका सिंचनाची कोणतीही व्यवस्था नसणाºया आणि विद्युत जोडणी नसणाºया वानखेडे सारख्या शेतकºयांना बसला. त्यांनी त्यांच्या १५ एकर सोयाबीनचे पीक नांगरले. यावेळी वानखेडे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शेततळे देण्याची मागणी केली. माधव वानखेडे यांनी सामूहिक शेततळ्याचा लाभ घेतला.
५६ मीटर, ४५ मीटर, ५.५ मीटर असे मोठे सामूहिक शेततळे तयार केले. तसेच शासनाच्या सौर कृषीपंप योजनेमधून त्यांना ७.५ एचपी सोलरपंपचाही लाभ मिळाला. त्यांच्याकडे पाणी आणि विद्युत अशा दोन्ही सुविधा उपलब्ध झाल्यावर त्यांनी जिराईत शेती संपूर्णपणे ओलीताखाली आणली. ५ एकरात केळी आणि ८ एकरमध्ये डाळिंबाची लागवड केली. तसेच आंतरपीक म्हणून सोयाबीन आणि हरभरा या पिकांचेही त्यांनी उत्पादन घेतले. मागील वर्षी केळीच्या उत्पादनातून त्यांना ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता ५ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तसेच सोयाबीन आंतरपिकातून १.५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर डाळिंबाचे उत्पन्न यावर्षी पासून सुरू होत आहे. मुख्य म्हणजे पाण्याची बचत करण्यासाठी त्यांनी फळबागेला ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. सामूहिक शेततळ्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले.
सोलरपंपामुळे माझी विजेची आणि पैशाची बचत होत आहे. शिवाय पिकांना वेळेत पाणी मिळाल्यामुळे उत्पन्नातही भर पडली. लोड शेडिंगमुळे रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जाण्याची आता गरज पडत नाही.
- माधव वानखेडे, शेतकरी, मदनी.