थकलेल्या आईवरच शिक्षणाचे ओझे
By admin | Published: June 25, 2014 11:56 PM2014-06-25T23:56:41+5:302014-06-25T23:56:41+5:30
कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मर्जी सांभाळताना थकून जाणाऱ्या आईच्या डोक्यावर मुलांच्या अभ्यासाचेही ओझे असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलांच्या अभ्यासाकडे वडिलांकडून
वर्धा : कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मर्जी सांभाळताना थकून जाणाऱ्या आईच्या डोक्यावर मुलांच्या अभ्यासाचेही ओझे असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलांच्या अभ्यासाकडे वडिलांकडून जास्त लक्ष दिले जात नसल्याचेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे. पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करणाऱ्या महिलाच मुलांच्या अभ्यासाची जास्त जबाबदारी पेलत असल्याचे यातून स्पष्ट होते.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना मुलांसाठी वेळ देणे कठीण झाले आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मुलांबरोबर त्यांच्या पालकांचीही कसरत होत आहे, असे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले. घरात वडिलांना पूर्ण वेळ देता येत नसल्यामुळे आपल्या पाल्याची जबाबदारी नकळत आईवर येऊन पडते.
मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. त्यामुळे शाळेतील शिक्षणाव्यतिरिक्त खासगी शिकवणीही लावली जाते. तसेच अनेक आई-वडील मुलांचा घरीही अभ्यास घेतात. मात्र, पालक म्हणून ही दोघांचीही समान जबाबदारी
असताना मुलांच्या संगोपनाबरोबरच त्यांच्या शिक्षणाकडेही आईलाच
लक्ष द्यावे लागते. त्यांचा गृहपाठ
करून घेणे, त्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी ती प्रयत्न करीत असते. परंतु, काही वेळा बदलत्या अभ्यासक्रमामुळे मुलांच्या अभ्यासातील अडचणी सोडवणे पालकांना कठीण जाते. त्यामुळे पालक खासगी शिकवण्या लावण्याला प्राधान्य देतात.
सर्वेक्षणामध्ये तब्बल ७५ टक्के मुलांच्या बाबतीत असे आढळून आले, की मुलांचे आई-वडील नोकरी करतात. तर, ३५ टक्के मुलांचा अभ्यासही आईला घ्यावा लागतो. मुलांचा अभ्यास घेण्यात केवळ १० टक्के वडील सक्रिय असल्याचे समोर आले आहे. दोघेही मिळून अभ्यास घेणाऱ्या पालकांची टक्केवारी ३० टक्के आहे. सर्वेक्षणामध्ये सुमारे ७ मुलांचा अभ्यास घरी कोणीही घेत नसल्याचेही दिसून आले. या मुलांना शाळा आणि खासगी शिकवणीमध्ये घेतल्या जाणाऱ्या अभ्यासावरच अवलंबून राहावे लागत असल्याचे दिसते. (स्थानिक प्रतिनिधी)