समाजशास्त्रावर गणिताचा भार

By admin | Published: May 7, 2017 12:35 AM2017-05-07T00:35:58+5:302017-05-07T00:35:58+5:30

मध्यंतरी पाठ फिरविलेल्या जिल्हा परिषदांच्या शाळांकडे पालक आता आकर्षित होऊ लागले आहेत.

The burden of mathematics on sociology | समाजशास्त्रावर गणिताचा भार

समाजशास्त्रावर गणिताचा भार

Next

जि.प.शिक्षणाचे तीनतेरा : भाषा शिक्षकांच्याही जागा रिक्त
रूपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मध्यंतरी पाठ फिरविलेल्या जिल्हा परिषदांच्या शाळांकडे पालक आता आकर्षित होऊ लागले आहेत. इंग्रजी शाळांतील विद्यार्थी जि.प.च्या शाळेत परतत आहेत. असे असताना शिक्षण विभाग मात्र गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात चालढकल करीत आहे. जिल्ह्यातील तब्बल २८४ शाळांत समाजशास्त्राचे शिक्षक गणित व विज्ञान हे विषय शिकवित आहेत. गणित आणि विज्ञनासारखा विषय तज्ज्ञांकडून शिकविणे अपेक्षित असताना येथे विपरित असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गणित व विज्ञानासह जिल्ह्यात भाषेच्या शिक्षकांचीही दैना आहे. तब्बल २१ शाळांत भाषेचे शिक्षक नाहीत. यामुळे तीही जबाबदारी समाजशास्त्राच्या शिक्षकावर आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार गणित व विज्ञानाच्या शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील समाजशास्त्राचे तब्बल १९० शिक्षक अतिरिक्त ठरतात. त्यांच्या समायोजनाची जबाबदारी शिक्षण विभागाला पार पाडावयाची आहे. जिल्ह्यात समाजशास्त्राच्या केवळ ६२ जागा मंजूर आहे. असे असताना समाजशास्त्राचे २५२ शिक्षक नियुक्त केले आहेत. या जागांवर गणित व विज्ञानाच्या शिक्षक नियुक्त केले तर तब्बल १९० शिक्षक अतिरिक्त ठरतात.
वर्धा पंचायत समितीतील उच्च प्राथमिक शाळांत गणित-विज्ञान विषयाचे ४२ शिक्षक मंजूर आहेत. सद्यस्थितीत येथे तीनच पदे भरली आहेत. प्रत्यक्षात ३९ पदे रिक्त असताना शिक्षण विभागाने केवळ ११ पदे रिक्त दाखविली. हिंगणघाट पं.स.मध्ये गणित-विज्ञान विषयाची ५३ पदे मंजूर असून येथेही तीनच पदे भरली आहे. येथे अजून ५० पदे रिक्त असताना शिक्षण विभागाने १८ पदेच रिक्त असल्याचे सांगितले. आर्वी विभागात ३३ पदे मान्य आहे. एकही पद भरलेले नसताना शिक्षण विभागाने सहाच पदे रिक्त दाखविली आहेत. अन्य पंचायत समितीतही हिच अवस्था आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमातील कलम १९ व २५ अंतर्गत परिशिष्टानुसार तसेच १३ डिसेंबर २०१३, २८ आॅगस्ट २०१५ व ८ जानेवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार उच्च प्राथमिक स्तरावरील वर्गांसाठी शिक्षकाचे पहिले पद गणित-विज्ञान विषयाकरिता, दुसरे पद भाषा विषयांकरिता व तिसरे पद सामाजिक शास्त्राकरिता भरणे आवश्यक आहे. २०१४ मध्ये उच्च प्राथमिकच्या वर्गांकरिता विषय शिक्षकांची नियुक्ती करताना शासनाचे सुस्पष्ट आदेश नाही. यातील त्रुटींमुळे गणित, विज्ञान ऐवजी सामाजिक शास्त्र विषयांच्या शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या. यानंतर न्यायालयीन याचिकांमुळे निर्णय घेणे शक्य झाले नाही; पण न्यायालयीन याचिका खारीज झाल्यानंतर वर्धेत आवश्यक अर्हताधारक शिक्षकांची नियुक्ती केली नाही.

बदली प्रक्रियेनंतर होणार समायोजन
जिल्ह्यातील शिक्षकांची बदली प्रक्रिया येत्या १५ तारखेनंतर होणार आहे. या बदली प्रक्रियेनंतर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाचा विचार करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. शिक्षकांच्या यंदाच्या बदल्या अवघड आणि साधारण क्षेत्राच्या वादात चांगल्याच अडकल्या होत्या. त्यावर मार्ग निघाला असून जिल्ह्यातील केवळ सातच गावे अवघड क्षेत्रात राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने समाजशास्त्राच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान शिकविण्यात येत आहे. यामुळे सध्याच्या स्थितीत गणित आणि विज्ञानाच्या ३५ आणि भाषेच्या २१ जागा रिक्त दाखविण्यात आल्या आहेत. प्रत्येक पंचायत समितीला त्यांच्या क्षेत्रातील गणित आणि विज्ञान विषय असणाऱ्या शिक्षकांची माहिती मागविली आहे. यातून या जागा भरण्यात येणार आहे. यात अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे बदलीनंतर समायोजन करण्यात येणार आहे.
- किसन शेंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. वर्धा

Web Title: The burden of mathematics on sociology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.