थांब्यावर येताच बस पडली बंद
By admin | Published: February 12, 2017 01:02 AM2017-02-12T01:02:50+5:302017-02-12T01:02:50+5:30
नवरगाव येथून वर्धेकडे जाणारी नवरगाव-वर्धा ही बस हिंगणी येथील प्रवाशी निवाऱ्याजवळ सकाळी १० वाजताच्या सुमारास आली
प्रवाशांना फटका : बसमध्ये होते ५० प्रवाशांसह विद्यार्थी
सेलू : नवरगाव येथून वर्धेकडे जाणारी नवरगाव-वर्धा ही बस हिंगणी येथील प्रवाशी निवाऱ्याजवळ सकाळी १० वाजताच्या सुमारास आली असता अचानक बंद पडली. या बसमध्ये ५० प्रवाशांसह विद्यार्थी होते. अचानक बस बंद पडल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागला.
वर्धा-नवरगाव ही बस नवरगाव येथून ५० प्रवासी घेवून वर्धेच्या दिशेने निघाली होती. सदर बस हिंगणी येथे आली असता बसमधील प्रवाशी उतरविण्यासाठी वाहन बस थांब्यावर थांबवून बंद करण्यात आले. हिंगणीचे विद्यार्थी व नागरिक बसमध्ये चढल्यानंतर चालकाने बस सुरू करण्याचा प्रयत्न केला असता बस सुरूच होत नव्हती. बराच वेळी प्रयत्न करूनही बस सुरू न झाल्याने बसमधील विद्यार्थ्यांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. शेवटी बस सुरू होत नसल्याचे लक्षात येताच प्रवाशांना दुसऱ्या बसने जाण्याचा सल्ला देण्यात आला. बऱ्याच वेळापर्यंत दुसरी बस न आल्याने प्रवाशांना आॅटोचा प्रवास करून नियोजित ठिकाणी पोहोचावे लागले. धावती बस बंद पडण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही बस अनेकदा बंद पडल्याचे नागरिक सांगतात. ग्रामीण भागात प्रवाशांसाठी भंगार बसेस सोडल्या जात असल्याचा आरोप प्रवाशी करतात. अचानक बस बंद पडल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांची तारांबळ उडली होती. तसेच हिंगणी नंतरच्या बस थांब्यावर अनेक प्रवशी याच बसची प्रतीक्षा करीत होते. त्यांनाही या घटनेमुळे नाहक त्रास सहन करावा लागला.(तालुका प्रतिनिधी)