संतप्त विद्यार्थ्यांनी अडविली अवेळी धावणारी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:25 AM2017-07-21T02:25:56+5:302017-07-21T02:25:56+5:30

ग्रामीण भागातील बसेसचे वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या शाळा, महाविद्यालयाच्या वेळा लक्षात घेऊन तयार केले जाते;

Bus running bus stopped by angry students | संतप्त विद्यार्थ्यांनी अडविली अवेळी धावणारी बस

संतप्त विद्यार्थ्यांनी अडविली अवेळी धावणारी बस

Next

अंदोरी येथील प्रकार : निवेदने देऊनही कार्यवाही शून्य
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : ग्रामीण भागातील बसेसचे वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या शाळा, महाविद्यालयाच्या वेळा लक्षात घेऊन तयार केले जाते; पण अंदोरी येथील विद्यार्थ्यांना सोईस्कर बसेस नसल्याने शैक्षणिक नुकसान सोसावे लागत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली; पण अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी गुरूवारी सकाळी अंदोरी येथे बस अडवून धरली. किमान या आंदोलनानंतर तरी बसची वेळ बदलली जाईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील अनेक विद्यार्थी देवळी, पुलगाव तथा वर्धा या शहरांमध्ये शिक्षणासाठी जातात; पण त्यांना शाळा, महाविद्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी बसफेरी उपलब्ध नाही. परिणामी, दररोज विद्यार्थी विलंबाने शाळा, महाविद्यालयात पोहोचतात. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत ११ जुलै रोजी निवेदन देण्यात आले होते. पुलगाव पोलीस स्टेशन तथा खा. रामदास तडस यांच्यामार्फतही परिवहन महामंडळाला निवेदन देण्यात आले; पण बसफेरीचा वेळ बदलण्यात आला नाही. कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थ्यांनी पुलगाव बसस्थानक प्रमुखांनादेखील निवेदन सादर केले होते; पण अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला होता.
गुरुवारी संतप्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केले. अंदोरी येथे बस अडवून धरण्यात आली. या आंदोलनातून विद्यार्थ्यांनी बसफेरीचा वेळ बदलण्यात यावा, ही मागणी लावून धरली. पुलगाव आगाराने अंदोरी येथे येणाऱ्या बसफेरीची वेळ न बदलल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संतप्त विद्यार्थ्यांकडून देण्यात आला. अंदोरी तथा लगतच्या गावांतील विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेत राज्य परिवहन महामंडळाचा निषेध नोंदविला.

Web Title: Bus running bus stopped by angry students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.