पुलाच्या अर्धवट बांधकामाने बससेवा बंद
By admin | Published: June 30, 2016 02:18 AM2016-06-30T02:18:39+5:302016-06-30T02:18:39+5:30
हिंगणी ते बोरधण मार्गावर शिवाजी पाटील यांच्या शेताजवळ असलेल्या रपट्यामुळे नाल्यातून रहदारी अडचणीची झाली होती.
विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल : बांधकाम विभागाची हलगर्जी
सेलू : हिंगणी ते बोरधण मार्गावर शिवाजी पाटील यांच्या शेताजवळ असलेल्या रपट्यामुळे नाल्यातून रहदारी अडचणीची झाली होती. यामुळे तेथे उंच पुलाचे बांधकाम सुरू आहे. रहदारीसाठी वळण रस्ता तयार करण्यात आला. त्या वळण रस्त्याचे खडीकरण करण्यात आले नाही. आता पावसामुळे रस्त्यावरून वाहनेच जाणे बंद झाले. परिणामी, बोरधरणला जाणारी बससेवाही हिंगणीपर्यंतच सिमीत करण्यात आली. यात ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.
बोर व्याघ्र प्रकल्प झाल्यानंतर बोरधरणचे महत्त्व वाढले. पर्यटकांची गर्दीही वाढली; पण या रस्त्यावरील पुलामुळे रहदारीलाच अडचण निर्माण झाली आहे. सदर पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते; पण कासवगतीने काम सुरू आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून केलेला वळण रस्ता केवळ माती टाकून करण्यात आला. आता पावसामुळे तो रस्ता चिखलमय झाला आहे. तेथून वाहनचालकांना वाहनेच काढता येत नाहीत. अनेक दुचाकी चालक पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे व वळण रस्ता खडीकरण, मजबुतीकरण करून मार्ग सुरळीत करावा, अशी मागणी राजेंद्र कोकाटे व ग्रामस्थांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
रहदारीही धोक्यात
सेलू ते बोरधरण मार्गावर सध्या रहदारी वाढली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामुळे या परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे. यातच हिंगणी ते बोरधरण दरम्यान पुलाचे बांधकाम करण्यात येत असल्याने आणि वळण रस्त्याचे खडीकरण न केल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित असताना बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे ते रखडले. परिणामी, चिखलामुळे अपघात होत आहे. आता बससेवा बंद झाल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.