बसफेरीच्या मागणीसाठी अडवली बस
By Admin | Published: April 9, 2015 02:56 AM2015-04-09T02:56:01+5:302015-04-09T02:56:01+5:30
तीन वर्षांपासून हिंगणघाट ते कवठा बसफेरीच्या मागणीसाठी विद्यार्थी वारंवार निवेदने देत आहेत;
समुद्रपूर : तीन वर्षांपासून हिंगणघाट ते कवठा बसफेरीच्या मागणीसाठी विद्यार्थी वारंवार निवेदने देत आहेत; पण राज्य परिवहन महामंडळ टाळाटाळ करीत असून वेळकाढू धोरण अवलंबित आहे़ यामुळे प्रहार संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेत बुधवारी रस्तारोको आंदोलन केले़ हिंगणघाट आगाराची बस अडवून धरताच गुरुवारपासून बसफेरी सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले़ यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले़
स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६८ वर्षानंतरही कवठा, किन्ही या गावात बसफेरी सुरू झाली नाही़ शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना पाच किमीची पापपीट करीत निंभा येथे जावे लागते. नागरिकांना दुचाकी वा पायी प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो़ ही अडचण लक्षात घेत प्रहार संघटनेने १९ डिसेंबर १३ रोजी हिंगणघाट-कवठा किन्ही बसफेरी सुरू करण्याची मागणी केली़ याबाबत हिंगणघाट आगार प्रमुखांना निवेदन दिले़ यानंतर निंभा ते कवठा रस्ता नादुरूस्त असल्याचे व गावात बस पलटविण्यास अपुरी जागा असल्याने बसफेरी सुरू करता येणार नाही, असे कळविण्यात आले. गतवर्षी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत निंभा ते कवठा किन्ही पक्क्या रस्त्याचे बांधकाम झाले. प्रहार संघटना व ग्रामस्थांनी गावातील कचरा साफ करीत बस पलटविण्यासाठी जागा केली. पुन्हा ६ जानेवारी १५ रोजी त्रुटींची पुर्तता केल्याचे पत्र विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ वर्धा येथे देण्यात आले. तेव्हा दर, टप्पा ठरविल्यावर बसफेरी सुरू होईल, असे सांगण्यात आले; पण हे आश्वासन पाळले नाही. यानंतर पुन्हा निवेदने देण्यात आली; पण कारवाई न झाल्याने अखेर बुधवारी बस अडवून धरण्यात आली़
या आंदोलनात तालुकाध्यक्ष देवा धोटे, प्रवीण जायदे, शरद काटुके, योगेश भेंडे, प्रशांत धोबे, अश्विन धाके, गोलू पन्नासे, मनोहर हिवरकर, आशिष नागपुरे, सचिन फाळेकर, आकाश राऊत तसेच गावातील महिला, पुरुष व शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.(तालुका प्रतिनिधी)