पंचाळा गावात पोहोचली परिवहन महामंडळाची बस
By admin | Published: April 27, 2017 12:46 AM2017-04-27T00:46:37+5:302017-04-27T00:46:37+5:30
डोंगरमाथ्यावर वसलेल्या ४५० लोकसंख्येच्या पंचाळा या आदिवासीबहुल गावात आजवर बस पोहचली नव्हती.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गावाला प्रथमच मिळाली बससेवा
आष्टी (शहीद) : डोंगरमाथ्यावर वसलेल्या ४५० लोकसंख्येच्या पंचाळा या आदिवासीबहुल गावात आजवर बस पोहचली नव्हती. गावात जाण्यासाठी रस्ता झाल्यावर बसची येत नसल्याने गावकऱ्यांना पायपीट करावी लागत. ग्रामस्थांनी वारंवार मागणी केल्यावर लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यावर अखेर पंचाळा गावात बससेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला.
तालुक्यातील पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, टुमणी ही गावे आतील भागात आहे. या गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून आष्टी ते पोरगव्हाण या रस्त्याच्या पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. दुसरा टप्पा आष्टी, पंचाळा, झाडगाव, टुमणी असा रस्ता तयार केला. यामुळे येथील गावकऱ्यांना तालुकास्थळी जोडणे सुलभ झाले. सदर गावे शेतीवर शंभर टक्के अवलंबून आहे. त्यांना रोजगाराचा अन्य पर्याय नाही. शेतमाल विक्रीसाठी आणायचा असल्यास रस्त्याअभावी गैरसोय होत होती. आता रस्ता झाल्याने हा प्रश्न सुटला आहे.
गावात जायला रस्ता नसल्याने महामंडळाची बस येत नव्हती. मात्र रस्ता झाल्यावर बस येत नसाल्याने गावकऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. माजी आमदार दादाराव केचे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. केचे यांनी वर्धा विभागाच्या व्यवस्थापकांना पंचाळा गावाला जाणारी बस सुरू करण्याची मागणी केली. तसेच बससेवा सुरू होईपर्यंत सतत पाठपुरावा केला. अखेर बससेवा सुरू झाल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सकाळी व सायंकाळी या दोन वेळेत बससेवा सुरू केली असून शिक्षणासाठी बाहेरगावी जोणाऱ्या विद्यार्थ्यांची यामुळे सोय झाली आहे. शासनाच्या योजना गावात पोहचल्यास विकास करणे सुलभ होते, असे सरपंच श्रीराम नेहारे यावेळी म्हणाले. पंचाळा गावाला बस सुरू झाल्याबद्दल लोकप्रतिनिधी यांच्यासह गावकऱ्यांनी परिवहन महामंडळाचे आभार मानले आहे. शासनाने पाणी पुरवठ्यासाठी येथे कायमस्वरुपी व्यवस्था करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)