बसस्थानक प्रमुख ठरली मुलांसाठी देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 06:00 AM2020-01-10T06:00:00+5:302020-01-10T06:00:19+5:30
महिला दोन मुलासह अचानक ३ जानेवारीला अमरावती बसस्थानकामधून अमरावती-चिमूर या बस मध्ये बसली. या बसमध्ये तळेगाव येथील बसस्थानक प्रमुख विद्या ठाकरे यासुद्धा तळेगावला बसल्या होत्या. अमरावती बसस्थानकातून बस सुटल्यानंतर वाहकाने प्रवाशांना तिकिटे देण्यास सुरुवात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : आर्वी येथील एका सामान्य कुटुंबातील मानसिक आजारग्रस्त महिला दोन मुलांसह २४ नोव्हेंबरला निघून गेली. नातेवाईकांनी परिसरात शाध घेतला; मात्र थांगपत्ता लागला नाही. अखेर आर्वी व अमरावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान बसस्थानकप्रमुखाला ही महिला व मुले आढळून आली. याविषयी कुटुंबीय आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.
महिला दोन मुलासह अचानक ३ जानेवारीला अमरावती बसस्थानकामधून अमरावती-चिमूर या बस मध्ये बसली. या बसमध्ये तळेगाव येथील बसस्थानक प्रमुख विद्या ठाकरे यासुद्धा तळेगावला बसल्या होत्या. अमरावती बसस्थानकातून बस सुटल्यानंतर वाहकाने प्रवाशांना तिकिटे देण्यास सुरुवात केली.
तिकिटाविषयी विचारपूस केली असता महिलेने नसल्याचे वाहकाला सांगितले. वाहकाने तळेगाव बसस्थानकप्रमुख विद्या ठाकरे यांना माहिती दिली. विद्या ठाकरे यांनी त्या महिलेसह दोन मुलांकडे पाहिले असता पोष्टरवरील महिला व मुलांचे छायाचित्र यात साम्य आढळले. ठाकरे यांनी तळेगाव स्थानकातील कर्मचाऱ्यास फोन करुन बसस्थानकातील पोष्टरचा फोटो काढण्यास सांगून व्हॉट्सअॅपवर मागविले असता त्या महिला व दोन मुले तेच असल्याची खात्री पटली. त्यांनी वाहकास पैसे देऊन तळेगाव बसस्थानकात त्यांना उतरविले. पोस्टरवर असलेल्या क्रमांकावर संपर्क माहिती दिली. लगेच त्या महिलेचा पती व नातेवाईक तळेगाव बसस्थानकात पोहोचले. महिलेला व त्या दोन मुलांना पाहून अश्रू अनावर झाले. बसस्थानक प्रमुखांचे आभार मानले.