प्रवाशांच्या सेवेत घाणेरड्या बसेस

By Admin | Published: August 22, 2016 12:29 AM2016-08-22T00:29:54+5:302016-08-22T00:29:54+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाते. एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास, हे ब्रीद मिरविले जाते;

Busy buses in the passengers' services | प्रवाशांच्या सेवेत घाणेरड्या बसेस

प्रवाशांच्या सेवेत घाणेरड्या बसेस

googlenewsNext

दुर्गंधीचा प्रवास : सुरक्षेची हमी राहिली कागदावरच
वर्धा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाते. एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास, हे ब्रीद मिरविले जाते; पण सध्या एसटीचा प्रवास तापदायक ठरू लागला आहे. महामंडळाच्या बसेस भंगार झाल्या असून प्रवाशांच्या सेवेत अस्वच्छ बसेस असल्याचे दिसून येते. परिणामी, दुर्गंधीचा प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये असंतोष पसरला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस फेऱ्या करून आल्यानंतर स्वच्छ करणे गरजेचे असते. परिवहन महामंडळाकडे तत्सम यंत्रणा कार्यरत आहे. असे असले तरी बहुतांश बसेस स्वच्छ न करताच पुन्हा प्रवासाकरिता पाठविल्या जातात. परिणामी, प्रवाशांना दुर्गंधीयुक्त वातावरणात बसमध्ये प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. पुलगाव, आर्वी आणि हिंगणघाट आगारातून सुटणाऱ्या बहुतांश बसेस अस्वच्छ राहत असल्याचेच दिसून येते. पुलगाव आगारातील बसेसमध्ये चालकाच्या ‘कॅबीन’मध्ये खर्रा पन्नी, पाण्याच्या रिकाम्या ‘क्रश’ केलेल्या बाटल्या, बिस्कीटच्या पुड्यांचे ‘रॅपर’ यासह अनेक कचरायुक्त ‘वेस्ट’ साहित्य दिसून येते. चालकाची कॅबीन कधीही साफ केली जात नसल्याप्रमाणेच बरबटलेली दिसून येते. हा परिसर धुळीने माखलेल्या अवस्थेत दिसून येतो. याच ठिकाणी चालकांना आपले जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, सोबत आणलेली ‘बॅग’ यासह अन्य वस्तू ठेवाव्या लागतात. परिणामी, चालकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शिवाय काही चालक बसमधूनच पिचकाऱ्या मारताना आढळून येतात. यामुळेही चालक कॅबीनमध्ये घाण साचत असून दुर्गंधी पसरते. याचा सामना चालक, वाहकासह संपूर्ण प्रवाशांना करावा लागतो.
बहुतांश बसेसमध्ये दिसत असलेला हा प्रकार दूर करण्याकरिता अधिकारी, कर्मचारी कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाहीत. आगारामध्ये बसेस साफ करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. प्रवासावरून आलेल्या बसेस पाण्याने धुवून स्वच्छ केल्या जातात; पण यातही दिरंगाईच केली जात असल्याने त्या धुतल्या की नाही, हा प्रश्नच पडतो. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत प्रवाशांना सुखकर प्रवासाची हमी देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

प्रथमोपचार पेट्या झाल्या हद्दपार
प्रवासामध्ये अपघात झाल्यास प्रवाशांवर प्रथमोपचार करता यावे म्हणून पूर्वी बसेसमध्ये प्रथमोपचार पेट्या ठेवण्यात येत होत्या. असे असले तरी बहुतांश बसेसमधील प्रथमोपचाराच्या पेटीमध्ये केवळ अगरबत्ती, माचिस यासह अन्य कचराच आढळून येत होता. उपचार करण्याचे साहित्य मात्र दिसतच नव्हते. यामुळे या पेट्या केवळ देखावाच ठरत होत्या. या पेट्यांचा उपयोगच होत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर महामंडळाद्वारे त्या पेट्या काढण्यात आल्या. आता वाहकाजवळ प्रथमोपचाराचे साहित्य दिले जात असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी हे साहित्य वाहक खरोखर घेऊन फिरतात काय, हा प्रश्नच आहे. आजही काही बसेसमध्ये प्रथमोपचाराच्या पेट्या आढळून येतात; पण यात उपचाराचे साहित्य दिसत नाही. या पेट्यांमध्ये कचराच साचलेला असतो. काही बसेसमध्ये तर सर्रास खर्रा ठेवण्यासाठी या पेट्यांचा वापर होत असल्याचे पाहावयास मिळाले.

दुरूस्तीकडेही कानाडोळा
प्रवासावरून आल्यानंतर बसेसची तपासणी केली जाते. काही प्रसंगी परिवहन महामंडळाचे मेकॅनिक बसस्थानकावर येऊन बससेची तपासणी करतात तर बहुतांश बसेस गॅरेजमध्ये पाठविल्या जातात; पण अनेकदा बसेसच्या दुरूस्तीकडे कानाडोळाच केला जातो. यामुळे भंगार व खिळखिळ्या झालेल्या बसेस मधेच बंद पडतात. परिणामी, प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

Web Title: Busy buses in the passengers' services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.