अधिकृत कृषी केंद्रांतूनच बियाण्यांची खरेदी करा
By admin | Published: June 8, 2015 02:31 AM2015-06-08T02:31:02+5:302015-06-08T02:31:02+5:30
रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशक खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनमान्य कृषी निविष्ठाचा विक्री परवाना ...
वर्धा : रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशक खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनमान्य कृषी निविष्ठाचा विक्री परवाना असलेल्या कृषी केंद्रातूनच रासायनिक खत, बियाणे व कीटकनाशक खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी यांनी केले आहे.
बोगस व बेकायदेशीर बियाणांच्या उत्पादनास व विक्रीस शासनाची परवानगी नसते. अशा बियाण्यांच्या उत्पन्नासंबंधी खोटे दावे करून शेतकऱ्यांना अमिष दाखविण्यात येते. व्यवहारामध्ये शासनमान्य दराचे अधिकृत बिल शेतकऱ्यास दिले जात नाही. पाकिटावर बियाण्याच्या गुणवत्तेचा तपशील व कोणत्याही तंत्रज्ञानाचा उल्लेख नसतो. बियाणांच्या परीक्षणपूर्व वापरामुळे जर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले तर त्यासाठी नुकसान भरपाईची हमी शासन किंवा ग्राहकमंच सुद्धा घेवू शकत नाही.
रासायनिक खत, बियाणे व कीटनाशक खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे, रासायनिक खते, बियाणे व कीटनाशक खरेदी करताना पक्क्या बिलाचाच आग्रह धरा, विक्रेते पक्के बिल देण्यास नकार देत असल्यास किंवा इतर कुठलीही शंका, तक्रार असल्यास कृषी विभागाला कळवा बिलावर खरेदी केलेल्या बियाणांच्या गुणवत्तेचा संपूर्ण तपशील नोंदविलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी. खरेदी केलेल्या बियाण्यांचे पाकीट सीलबंद, मोहोरबंद तथा लेबलसह असल्याची खात्री करावी, बियाणांच्या उगवण क्षमतेची अंतिम मुदतीची तारीख पाहूनच पाकीट, बॅग खरेदी करा. एमआरपीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असल्यास त्वरीत कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, रासायनिक खत खरेदी करताना बॅगेवरील एमआरपी किंमत बघूनच खरेदी करावी.
सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारच्या बियाणे, खत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी विशिष्ठ वाणांचा तुटवडा असल्याच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. कोणत्याही अप्रचारावर विश्वास न ठेवता परवानाधारक विक्रेत्यांकडूनच कृषी निवीष्ठा खरेदी कराव्यात. तसेच काही कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रलोभनावर विश्वास ठेऊ नये.
जिल्ह्यात कोणतीही व्यक्ती अथवा संस्था बेकायदेशीर पद्धतीने बोगस बियाणांची, खताची विक्री करताना आढळल्यास त्याच्याविरुद्ध कार्यवाही केली जाईल असेही सांगण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी)