बीटीआर-७ 'वाघिण'साठी सापळा लावून केले जातेय 'वेट ॲण्ड वॉच'
By महेश सायखेडे | Published: October 8, 2022 04:54 PM2022-10-08T16:54:17+5:302022-10-08T17:03:13+5:30
बीटीआर-७ 'पिंकी'ला पिंजराबंद करण्यासाठी बारा चमूंचे युद्धपातळीवर प्रयत्न
वर्धा : देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाची राणी अशी ओळख असलेल्या कॅटरिना (बीटीआर-३)ची मुलगी पिंकी (बीटीआर-७) ला पिंजराबंद करण्यासाठी नियोजनबद्ध पणे सापळा लावण्यात आला आहे. या सापळ्यात वाघिणीचे भक्ष्य बनावे म्हणून पाळीव जनावराला बांधून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी 'वेट ॲण्ड वॉच' च्या भूमिकेत आहेत. एकूणच बीटीआर-७ (पिंकी) या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या तीन तर प्रादेशिक वनविभागाच्या तब्बल नऊ चमू युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.
पाळीव जनावरास ठार केल्यावर परतली दाट जंगलात
बीटीआर-७ या वाघिणीने कारंजा तालुक्यातील जोगा जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी पाळीव जनावराची शिकार केली. पण वाघिणीने या जनावराचा पूर्णत: फस्त केले नसल्याने ती शिकार खाण्यासाठी परतेल असा अंदाज वनविभागाला होता. त्यामुळे सुरूवातीला या ठिकाणावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वॉच ठेवला. शिवाय कॅमेरेही लावले. पण ती येथे परतली नाही. शिवाय ती कारंजा तालुक्यातीलच दाट जंगलाकडे परल्याचे सांगितले जात असून बीटीआर-७ ला युद्धपातळीवर पिंजराबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
ट्रॅप आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वॉच
ज्या परिसरात वाघिणीला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला आहे, त्यासह इतर परिसरावर ट्रॅप आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवला जात आहे. असे असले तरी अद्यापही ही वाघिण कॅमेऱ्यांत कैद झालेली नाही. तर प्रादेशिक वन विभाग आणि बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाच्या चमू तिचे ठोस लोकेशन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ग्रामस्थांचे सहकार्य ठरेल महत्त्वाचे
बीटीआर-७ ला पिंजराबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत. इतकेच नव्हे तर जंगलात सापळाही लावण्यात आला आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गावागावात जात खबरदारीच्या सूचना देत आहेत. याच सूचनांचे ग्रामस्थांनी काटेकोरपणे पालन केल्यास ग्रामस्थांचे हे सहकार्य वाघिणीला वेळीच पिंजराबंद करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मानव-वन्यजीव संघर्ष टळावा या हेतूने कारंजा तालुक्यातील विविध भागातील ग्रामस्थांनी वनविभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.