कामगारांच्या प्रश्नावर संयुक्त बैठक बोलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:29 PM2018-07-18T22:29:01+5:302018-07-18T22:30:13+5:30
मोहता मिल अॅन्ड व्हिवींग अॅन्ड स्पिनींग मिल मधील कामगारांच्या प्रश्नासंदर्भात संयुक्त बैठक बोलावून कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी अप्पर आयुक्त नागपूर यांच्याकडे माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : मोहता मिल अॅन्ड व्हिवींग अॅन्ड स्पिनींग मिल मधील कामगारांच्या प्रश्नासंदर्भात संयुक्त बैठक बोलावून कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी अप्पर आयुक्त नागपूर यांच्याकडे माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली आहे. मोहता मिल हिंगणघाटला १२० वर्ष पूर्ण होत आहे. या मिलमध्ये व्हिवींग अॅन्ड स्पिनिंग, प्रोसेसिंग युनिट सुरू झाले आहे. या मिलमध्ये तीन पाळ्यात कामगार काम करतात. जवळ-जवळ १२०० ते १३०० कामगार २०१५ पर्यंत काम करीत होते. तसेच ठेकेदारीमध्ये जवळपास २०० कामगार काम करतात. १ मार्च २०१७ पासून मोहता मिलच्या व्यवस्थापनाने कपडा खाता बंद केला आहे. त्यामुळे ४५० कामगार कमी झाले. या मिलचा माल विदेशात पाठविला जातो. कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित आहे. यामध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघ, हिंगणघाटची निवडणूक जुन्या घटनेप्रमाणे घेण्यात यावी. ठेकेदारी पद्धत बंद करून नवीन भरती करण्यात यावी. बदली कामगारांना कायम करण्यात यावे. कामगारांना सुट्या देण्यात याव्या. बदली कामगारांना काम देण्यात यावे. तांत्रिक अडचणीमुळे मशीन बंद असेल तर कामगारांना लेआॅफ देण्यात यावा, ओव्हरटाईम करणाऱ्या कामगारांना डबल पगार देण्यात यावा. मशीनच्या चुकीमुळे माल खराब झाला किंवा फाटला तर त्याची जबाबदारी कामगारांवर राहणार नाही. तसेच कामगारांना काम करताना चष्मा, जोडे, कापड, हॅन्डक्लोज या वस्तू देण्यात याव्या. फॅक्टरी अॅक्टप्रमाणे सुविधा देण्यात याव्या. स्पिनींग विभागात मशीनची स्पिड व्यवस्थित ठेवण्यात यावी, आदी मागण्याचे निवेदन तिमांडे यांनी अप्पर आयुक्त यांना सादर केले. व या सदंर्भात बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी केली.
मीलमधील कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती द्या
कपडा खाता विभाग बंद करताना ४५० कामगारांन स्वेच्छा निवृत्ती मंजूर करून देणे आवश्यक होते. परंतु त्याआधी व्यवस्थापने कपडा खात्यातील ६८ कामगारांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. कामगारांचे हित लक्षात घेवून उर्वरित कामगारांना स्वेच्छा निवृत्ती घेण्याबाबत आदेश देण्यात यावे, अशी मागणी तिमांडे यांनी केली आहे.