किरायेदार म्हणून आले; घरावर हक्क गाजवू लागले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 05:00 AM2021-07-05T05:00:00+5:302021-07-05T05:00:15+5:30
काही किरायेदारांनी घरमालकांच्या नाकीनऊ आणले आहे. बऱ्याच दिवसांपासून किराया न देता राहत आहे. किराया द्या किंवा घर खाली करा, म्हटले तर घरमालकालाच दमदाटी करून घरावर ताबा मिळवून बसले आहे. कोणतेही कष्ट न करता किंवा मोबदला न देता फुकटात घरावर वेटोळे मारून बसल्याने घरमालकाच्या घामाची कमाई अडचणीत आली आहे. हक्काचे घर ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे दार ठोठावले तर ते न्यायालयाकडे बोट दाखवितात.
आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नियमित जीवन जगताना पैशांची बचत करून भविष्याची पुंजी म्हणून घर खरेदी केले. राहत्या घरात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याने चार पैसे मिळावे म्हणून दुसरे घर किरायाने दिले. आता किरायाने दिलेल्या घराचे नव्याने बांधकाम करावे किंवा ते विकावे म्हटले तर किरायेदार घर खाली करायला तयार नाही. पोलिसांत तक्रार दिली तर पोलीस न्यायालयाचा मार्ग दाखवतात. याच परिस्थितीचा फायदा घेत किरायेदार म्हणून आलेले आता घरावर मालकी हक्क गाजवायला लागल्याने घरमालकाची आर्थिक कोंडी झाली आहे.
मुला-बाळांसह परिवाराचं आयुष्य सुखकर व्हावं, याकरिता भविष्याची तरतूद म्हणून अनेकांनी घर, भूखंड खरेदी करण्यावर भर दिला आहे. यात घर घेणाऱ्यांनी ते रिकामे राहण्यापेक्षा किरायाने दिले. यातून काही घरमालकांना नियमित किराया मिळत असून किरायेदारही त्यांना साथ देत आहे. मात्र, काही किरायेदारांनी घरमालकांच्या नाकीनऊ आणले आहे. बऱ्याच दिवसांपासून किराया न देता राहत आहे. किराया द्या किंवा घर खाली करा, म्हटले तर घरमालकालाच दमदाटी करून घरावर ताबा मिळवून बसले आहे. कोणतेही कष्ट न करता किंवा मोबदला न देता फुकटात घरावर वेटोळे मारून बसल्याने घरमालकाच्या घामाची कमाई अडचणीत आली आहे.
हक्काचे घर ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे दार ठोठावले तर ते न्यायालयाकडे बोट दाखवितात. न्यायालयात गेलो तर आयुष्य निघून जाईल; पण, निकाल लागणार नाही.
या भीतीमुळे ते न्यायालयातही जाणे टाळत असल्याचे याच संधीचा फायदा काही किरायेदार घेत आहे. त्यामुळे हक्काचे घर परत मिळविण्यासाठी घरमालकांची दाहीदिशा भटकंती सुरू आहे.
म्हणून या गोष्टींची खबरदारी आवश्यक...
सध्या मालमत्तेचे भाव चांगलेच कडाडल्याने कोण, कशापद्धतीने ती बळकावेल, याचा नेम नाही. म्हणून घरमालकाने किरायेदारावर विश्वास टाकणे सध्या धोक्याचे आहे.
किरायेदार ठेवताना त्याची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. त्याचे संपूर्ण नाव, गाव, कुठे काम करतो आदी माहिती घेऊन त्याच्याकडून शंभर रुपयांच्या मुद्रांकावर करारनामा करून घेणे बंधनकारक आहे.
दरवर्षी अकरा महिन्यांचा करारनामा करून घ्यावा. त्यामध्ये ठरलेला किराया, दरवर्षी किरायामध्ये किती वाढ होणार, अग्रीम भाडे आदींचा समावेश करून किरायेदाराची स्वाक्षरी करावी. तसेच त्याची किरायेदाराला एक प्रत देऊन यासंदर्भात पालिकेलाही माहिती देणे गरजेचे आहे. पण, असे कुठेही होताना दिसत नसल्याचे अडचणी वाढत आहे.
गावगुंडांसह राजाश्रय...
- शहरात बऱ्याच व्यक्तींनी किरायावर घर किंवा गाळे दिले आहेत. पण, त्याची रितसर नोंद केलेली नसल्याने आता त्या किरायाच्या मालमत्तेवर मालकी हक्क गाजविला जात आहे. ‘लोकमत’कडे तीन प्रकरणांसंदर्भात माहिती आली असून शहरात अशी अनेक प्रकरणे आहेत. काही व्यक्ती घरमालकावर गावगुंडांकडून दबाव आणत घर ताब्यात ठेवत आहे. तर काही किरायेदार राजकीय वलयात वावरणारे असून त्याचाही दबाव घरमालकावर टाकून किरायावर घेतलेली मालमत्ता हडपण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांचे न्यायालयाकडे बोट
किरायेदार घर खाली न करता घरमालकावरच दबाव टाकायला लागले की, घरमालक पोलीस ठाण्यात धाव घेतो. परंतु, सदर प्रकरणात गुन्हा दाखल करून न घेता न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा सल्ला दिला जातो. न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यानंतर ‘तारीख पे तारीख’ सुरू होत असल्याने न्याय मिळण्यास बराच उशीर लागतो. म्हणून न्यायालयाची पायरी चढण्यास घरमालक तयार होत नाही. याचाच फायदा सध्या काही किरायेदार उचलताना दिसत आहे.
प्रकरण क्र. : १
रामनगर परिसरात मुख्य मार्गालगत एक मालमत्ता आहे. त्या ठिकाणी असलेल्या इमारतीमध्ये किरायेदार ठेवण्यात आले होते. काही दिवसांनी ही इमारत जीर्ण झाल्याने किरायेदार निघून गेले पण, एका किरायेदाराने घर खाली करून देण्यास नकार दिला. त्यामुळे त्रस्त झालेल्या मालमत्ताधारकाने त्या सर्व जागेचा सौदा केला. ज्याने ती जागा घेण्याचा सौदा केला होता, त्याने त्या किरायेदाराची भेट घेऊन घर खाली करण्याची विनंती केली. परंतु, त्याने घर खाली करण्याच्या मोबदल्यात ६ लाख रुपयांची मागणी केली. परिणामी, हा सौदा फिसकटला आणि मालमत्तामालकाला घेतलेला इसार परत करावा लागला. नाईलाजास्तव मालमत्ताधारकाने किरायेदाराकडून काही पैसे घेऊन काही जागा त्याचे नावे करून दिली. त्यानंतर उर्वरित जागा इतरांना विकण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पुढील व्यवहार करण्यात आला.
प्रकरण क्र. : २
शहरातील महादेवपुरास्थित मुख्य बाजारपेठेत दोन मजली इमारत आहे. घरमालक वयोवृद्ध असून ते मुलांसह बाहेरगावी राहतात. त्यामुळे त्यांनी येथील किरायेदार ठेवले होते. इमारतही आता जीर्ण झाली असून पालिकेकडूनही नोटीस बजावण्यात आला. त्यामुळे घरमालकाच्या विनंतीवरुन वरच्या माळ्यावर राहणाऱ्यांनी घर खाली केले परंतु, तळमजल्यावर किरायेदार घर खाली करून देण्यास तयार नाहीत. त्यांना वारंवार विनंती करूनही त्यांचा डोळा आता मालमत्तेवर असल्याने मोठ्या मेहनतीने कमावलेली मालमत्ताही आता किरायेदार दडपून बसल्याने अडचणी वाढल्या आहे. वृद्ध घरमालकासह त्यांची मुलेही वर्ध्यात येत घर खाली करण्यास सांगत आहे. मात्र, किरायेदारच मालकाप्रमाणे वर्तन करीत आहे.
प्रकरण क्र. : ३
शहरातील साईनगरस्थित एका परिवाराने भविष्याची पुंजी म्हणून म्हाडा कॉलनीमध्ये घर विकत घेतले. ते घर काही दिवसांपूर्वी एका कुटुंबाला किरायाने दिले. आता त्या घराची दुरुस्ती व बांधकाम करायचे असल्याने किरायेदाराला घर खाली करून देण्याची मागणी केली. परंतु, किरायेदाराने घर खाली करून देण्यास मनाई करीत घरमालकालाच धमकाविणे सुरू केले. त्यामुळे घरमालकाने किरायेदाराचे साहित्य बाहेर काढून आपले कुलूप लावले.मात्र, किरायेदाराने पुन्हा त्या घरावर ताबा मिळवित मजुरी कायम ठेवली. याकरिता राजकीय दबावतंत्राचाही वापर केला जात आहे. त्यामुळे घरमालकाने पोलिसांत धाव घेतली. पण, न्याय मिळाला नाही. अखेर गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून घर खाली करून घेण्यासाठी घरमालक धडपडत आहे.