कालव्यांचे रस्ते त्रासदायक
By Admin | Published: August 20, 2016 02:02 AM2016-08-20T02:02:45+5:302016-08-20T02:02:45+5:30
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी परिसरात सिंचनाची सोय करून कालव्यांचे जाळे निर्माण करण्यात आले.
शेतकरी अडचणीत : मार्गावरून घसरून पडण्याची शक्यता बळावली
नाचणगाव : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी परिसरात सिंचनाची सोय करून कालव्यांचे जाळे निर्माण करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली. कालव्याच्या काठाने शेतात जाण्यासाठी तयार केलेल्या रस्त्याची मात्र पूर्णत: वाट लागली आहे. त्यामुळे शेतात जाणे शेतकऱ्यांसाठी त्रासदायक झाले आहे.
निम्न वर्धा प्रकल्पामुळे पुलगाव व नाचनगाव परिसरातील खातखेडा, कोळोणा, घोडेगाव, सोनोरा या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जमिनी द्यावा लागल्या. काही कालव्यामुळे शेतांचे दोन भागात विभाजनही झाले. शेतात येण्यासाठी कालव्याच्या दुतर्फा असलेल्या रस्त्याचा वापर होऊ लागला. परंतु पावसाळ्यात या रस्त्यांवर चिखल होत असल्यामुळे वाहनांनी तर दूरच साधे पायी चालणेही अवघड झाले आहे. त्यातच पावसामुळे रस्त्यालगत असलेली झाडझुडपे वाढून त्याचा त्रास वाहतुकीस होत आहे. कालवे तयार करताना सदर रस्त्यांचे पक्के खडीकरण करणे गरजेचे होते. सध्या शेतीकामांना वेग आला आहे. परंतु रस्त्याचे तीनतेरा वाजले असून चिखलामुळे शेतात पोहोचणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे.(वार्ताहर)
रस्त्यांवर सर्वत्र चिखल
गत काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कालव्यालगतच्या रस्त्यांवर सर्वत्र चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतात कसे जावे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. सध्या शेतातील कामांना वेग आला आहे. बैलबंडी घेऊन शेतात जावे लागते. परंतु कालव्यांच्या रस्त्यावर दोन दोन फुटापर्यंत चिखल साचल्यामुळे शेतात जाणे कठीण झाले आहे. येताना अंधार होत असल्याने चिखलात घसरून कालव्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पक्के खडीकरण करण्याची आवश्यकता
कालव्याला लागून असलेले रस्ते निव्वळ मातीचे असल्याने त्यावर चिखल निर्माण झाला आहे. सदर रस्त्यांचे पक्के खडीकरण झाल्यास त्यावर वाहतूक करणे सोपे होईल. निम्न वर्धा प्रकल्पामुळे पुलगाव व नाचनगाव परिसरातील खातखेडा, कोळोणा, घोडेगाव, सोनोरा या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जमिनी द्यावा लागल्या आहेत.