कालव्याचे पाणी सोडले शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 09:57 PM2018-02-18T21:57:21+5:302018-02-18T21:57:37+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून निर्माण केलेला निम्न वर्धा प्रकल्प सध्या डोकेदुखी ठरू लागला आहे. कालव्याच्या सदोष कामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने असंतोष पसरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून निर्माण केलेला निम्न वर्धा प्रकल्प सध्या डोकेदुखी ठरू लागला आहे. कालव्याच्या सदोष कामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने असंतोष पसरला आहे. देवळी तालुक्यातील मौजा रायपूर येथे असाच प्रकार झाल्याने शेतातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे अगत्याचे झाले आहे.
निम्न वर्धा प्रकल्पाचा डावा कालवा देवळी तालुक्यातून गेला आहे. सदर कालवा मौजा रायपूर येथील सर्व्हे क्र. ९९.१०० या शेताजवळ बंद करण्यात आला आहे. कालव्याचे अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी शेताच्या जवळ नाली करण्यात आली आहे. भविष्यात या कालव्याला पाणी सोडल्यानंतर अतिरिक्त पाणी सदर नालीतून वाहून जाताना शेतात शिरण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्याला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. रायपूर येथील दत्तात्रय मसणे यांच्या शेताच्या धुऱ्यावरच कालव्याचे पाणी वाहून जाण्याकरिता नाली करण्यात आली आहे. नालीलगत रस्त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. सदर कालवा शेताजवळ बंद झालेला आहे. यामुळे कालव्यातील अतिरिक्त पाणी शेताच्या बाजूने नालीद्वारे वाहून जाणार आहे. परिणामी, मसणे यांच्या शेतातील पिकांनाच धोका निर्माण झाला आहे. सर्व्हे क्र. ९८ हे बाबाराव मसणे यांचे शेत असून या पाण्यामुळे त्यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील पिकेही धोक्यात आली आहेत.
कालव्याची कामे करताना शेतकऱ्यांशी चर्चा केली जात नाही. त्यांची कुठलीही परवानगी घेतली जात नाही वा त्यांना सूचनाही दिली जात नाही. परिणामी, सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून केलेली कामे शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालवे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. तत्पूर्वी शेतकरी मसणे यांनी अनेकदा तक्रारी केल्या. त्यावर तलाठ्याकडून अहवालही मागविण्यात आला; पण अद्याप कुठल्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. यामुळे कालव्याला पाणी सोडल्यानंतर तथा पावसाळ्यात मसणे यांना शेती करणेच जिकरीचे ठरणार आहे. यामुळे वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
अनेक ठिकाणी कामे अपूर्णच
गत कित्येक वर्षांपासून निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे काम सुरू आहे; पण अद्यापही डावा कालवा पूर्णत्वास गेलेला नाही. पुलगाव शहरात अद्याप खोदकामही पूर्ण करण्यात आलेले नाही. असे असले तरी कालव्याला पाणी सोडले जाते. परिणामी, शहरात तथा परिसरातील गावांत अनेक घटना घडल्या आहेत. देवळी तालुक्यात बहुतांश ठिकाणी कालव्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे; पण पुलगाव शहरातील कालव्याचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. शिवाय पाटचऱ्यांची कामे अद्याप सुरूही करण्यात आलेली नाहीत. यामुळे बहुतांश शेतांपर्यंत अद्यापही पाणी पोहोचलेले नाही. पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची अद्याप सिंचनाची सुविधा झालेली नाही. निम्न वर्धा प्रकल्प कालवे विभागाने याकडेही लक्ष देत कालवा तथा पाटचऱ्या पूर्ण करणे गरजेचे आहे.
मसणे यांच्या तक्रारीवरून वरिष्ठांनी मोका पाहणी केली. सदर शेताजवळ कालवा बंद केला आहे. शेताच्या शेजारून काढलेली नाली बुजवून पाटचरी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
- आर.आर. बोडेकर, उपअभियंता, निम्न वर्धा प्रकल्प, कालवे विभाग, देवळी.