कालव्याचे पाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:49 PM2017-12-03T23:49:32+5:302017-12-03T23:50:30+5:30
अप्पर वर्धा कालवे विभागाच्यावतीने सोडण्यात आलेले पाणी थेट आष्टी-किन्हाळा रस्त्यावरून वाहात असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा तयार झाला असून तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी(शहीद) : अप्पर वर्धा कालवे विभागाच्यावतीने सोडण्यात आलेले पाणी थेट आष्टी-किन्हाळा रस्त्यावरून वाहात असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा तयार झाला असून तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी आहे.
आष्टी-किन्हाळा हे अंतर अवघ्या सहा कि.मी.चे आहे. या रस्त्यावर अर्ध्यापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम झाले आहे. या मार्गाने ये-जा करणाºयांना दगड तुडवतच पुढील प्रवास करावा लागतो. या मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. हा रस्ता जि.प.च्या दोन सर्कलच्या हद्दीमध्ये विभागल्या गेल्यामुळे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामांवरही परिणाम झाला आहे. आष्टी येथे नगरपंचायत झाल्याने आता आष्टीचीही हद्द संपली आहे. सध्या लहान आर्वी हद्दीमध्येच पूर्ण रस्ता देण्यात आला आहे. रस्त्याच्या कामासाठी निधी देण्यास वारंवार टाळाटाळ केल्या जात असल्याची परिसरात ओरड आहे. त्यातच हे नवीन संकट ओढावल्याने नागरिकांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या चना पिकाच्या पेरणीसाठी अप्पर वर्धा धरण विभागाने पाणी कालव्याद्वारे सोडले आहे; पण या मौजामधील कालवे व पाटचºया नादुरूस्त असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. इतकेच नव्हे तर आष्टी-किन्हाळा मार्गावर अनेक ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहे. दिवाकर भिवापुरे यांच्या शेताजवळ पाण्याच्या जोरदार प्रवाहामूळे रस्ताच वाहून गेला असून रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा तयार झाला आहे. तसेच परिसरात पाण्याचे डबके तयार झाले आहे. हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य कार्यवाही करण्याची मागणी अनिकेत मानकर, ऋषिकेश भिवापुरे, वैभव मुळे, आदेश डुकरे, विक्की ठाकरे, विकास डुकरे, आदेश भिवापुरे यांनी केली आहे.
पाण्यातून करावी लागते ये-जा
जलाशयातून सिंचनासाठी सोडण्यात आलेले पाणी वितरीका नादुरूस्त असल्याने रस्त्यावरून वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्याच्या मधोमध खड्डा तयार झाला आहे. शिवाय अनेक ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहे. सध्या शेतकºयांकडून रबी हंगामातील विविध शेती कामे झटपट पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात असला तरी या मार्गावरून ये-जा करणाºयांना पाण्यातूनच मार्ग काढत पुढील प्रवास करावा लागत आहे.