जीवनावश्यक वस्तुंवरील जीएसटी रद्द करा
By admin | Published: July 14, 2017 01:34 AM2017-07-14T01:34:54+5:302017-07-14T01:34:54+5:30
केंद्र शासनाने एक देश, एक कर अर्थात जीएसटीचा उदोउदो केला. सामान्य नागरिक मात्र या प्रवाहात फरफटत आहे.
महिला काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्र शासनाने एक देश, एक कर अर्थात जीएसटीचा उदोउदो केला. सामान्य नागरिक मात्र या प्रवाहात फरफटत आहे. नागरिकांच्या दैनंदिन उपयोगाच्या तथा जीवनावश्यक वस्तुंवरही जीएसटी लागल्यामुळे त्या महागल्या आहेत. यामुळे असंतोष पसरला आहे. यातील जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करावा, अशी मागणी वर्धा जिल्हा महिला काँगे्रस कमिटीने केली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन देण्यात आले.
विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे म्हणून वर्धा जिल्हा महिला काँग्रेसने संपूर्ण जिल्ह्यात महिलांच्या सह्यांची मोहीम राबविली होती. त्यावेळी सुमारे दोन हजार सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. आता महिलांच्या जीवनातील अविभाज्य घटक म्हणजे मासिक पाळी होय. त्यात वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकीनवरही १२ टक्के जीएसटी लागला आहे. परिणामी, महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक ताण जाणवत आहे. महिला नेहमी कुटुंबाला प्रथम प्राधान्य देतात व स्वत:च्या गरजांना दुय्यम स्थान देतात. तेव्हा जीवनावश्यक वस्तू महागल्याने अतिसामान्य महिलांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
सोबतच सर्वसामान्य नागरिकांना जीएसटीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेत जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, कुंदा भोयर, रंजना पवार, नलिनी भोयर, वैदा शेख यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.