एसटी बँकेची नोकर भरती तातडीने रद्द करा; चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपर निबंधकांनी दिले महामंडळाला पत्र

By रवींद्र चांदेकर | Published: August 27, 2024 06:44 PM2024-08-27T18:44:37+5:302024-08-27T18:45:33+5:30

या पत्रामुळे एसटी महामंडळाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Cancel ST Bank recruitment immediately; | एसटी बँकेची नोकर भरती तातडीने रद्द करा; चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपर निबंधकांनी दिले महामंडळाला पत्र

एसटी बँकेची नोकर भरती तातडीने रद्द करा; चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपर निबंधकांनी दिले महामंडळाला पत्र

वर्धा : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँक, लि. मुंबईने ॲडहॉक व तात्पुरत्या पद्धतीने केलेली अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती ही योग्य व विहित पद्धतीने केली नाही. त्यामुळे ही नोकर भरती त्वरित रद्द करण्याबाबतचे पत्र पुणे येथील सहकारी संस्थांचे अपर निबंधक (प्रशासन) शैलेश कोतमिरे यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट बँकचे अध्यक्ष तथा महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे. या पत्रामुळे एसटी महामंडळाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेच्या नवीन संचालक मंडळाने बँकेत केलेल्या बेकायदेशीर नोकरभरतीबाबत विविध संघटनांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग -१, सहकारी संस्था, मुंबई यांनी १५ जुलै रोजी चौकशी अहवाल सादर केला. त्या अहवालात स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँक लि. मुंबई या बँकेने ॲडहॉक व तात्पुरत्या पद्धतीने केलेली अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती योग्य व विहित पद्धतीने केली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्या अनुषंगाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती त्वरित रद्द करण्यात यावी, असे पत्र सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणेचे अपर निबंधक (प्रशासन) शैलेश कोतमिरे यांनी १३ ऑगस्टला दिले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची आणि एसटी कर्मचाऱ्यांमार्फत चालविली जाणारी पगारदारांची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लि. ही सहकारी संस्था १९५३ पासून कामगारांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कार्यरत आहे. जून २०२३ मध्ये एसटी बँकेच्या निवडणुकीत सत्तांतर झाले. त्यानंतर बँकेच्या कारभाराविषयी एसटी कामगार सेनेने ४ फेब्रुवारी २०२४ रोजी निवेदन देऊन नोकर भरतीच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने ४ जुलै २०२४ रोजी निवेदन देऊन बँकेच्या संचालक मंडळाच्या बेकायदेशीर व अन्यायी वर्तनाविरोधात आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी एसटी कामगार सेनेने नोकर भरती प्रक्रियेस तातडीने स्थगिती देण्याची मागणीही केली होती, असे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी सांगितले.

कारवाईकडे लागले लक्ष

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांना नोकर भरती रद्द करण्याचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता या पत्रावर कोणती कारवाई होते, याकडे महामंडळाच्या कामगारांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी याप्रकरणी तत्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Cancel ST Bank recruitment immediately;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.