विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सक्ती रद्द करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:06 AM2017-10-09T00:06:02+5:302017-10-09T00:06:12+5:30
विद्यार्थ्यांचे आधार कार्ड न नोंदविल्यास त्या विद्यार्थ्यांना शिक्षक संच मान्यतेसाठी गणले जाणार नाही, असे शिक्षण संचालक पुणे यांनी २८ सप्टेंबर रोजी आदेश काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विद्यार्थ्यांचे आधार कार्ड न नोंदविल्यास त्या विद्यार्थ्यांना शिक्षक संच मान्यतेसाठी गणले जाणार नाही, असे शिक्षण संचालक पुणे यांनी २८ सप्टेंबर रोजी आदेश काढले. सदर आदेश रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीने केली आहे. याबाबत शिक्षणाधिकाºयांमार्फत शिक्षण सचिवांना निवेदन देण्यात आले.
शाळेत दाखल झालेल्या बºयाच मुलांचे आधार कार्ड अद्याप काढलेले नाही. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार आधार कार्ड नाही, या सबबीखाली मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. नियमानुसार ३० सप्टेंबरची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून शिक्षक संख्या मान्य करण्यात येते; पण शाळेच्या पटावर विद्यार्थी असताना आधार कार्ड नाही, या सबबीखाली त्यांना ग्राह्य न धरणे हे नियमबाह्य आहे. यात नियमबाह्यपणे शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे. आधीच राज्यभर मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त असताना आधार कार्ड नसल्याने शिक्षक संख्या मान्य करताना अशा मुलांना ग्राह्य न धरणे, हे अनाकलनीय आहे. आधार कार्ड काढणे, ही शिक्षकांची जबाबदारी नाही. असे असताना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही म्हणून शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे न्यायोचित ठरणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व आधार कार्डची माहिती यामध्ये तफावत आहे. यामुळे अशा मुलांची माहिती आॅनलाईन करताना अडचणी येत आहेत. शिवाय ज्या विद्यार्थ्यांजवळ आधार कार्ड नाही; पण त्यांचा प्रवेश शाळेत झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड दिलेल्या अवधीत काढणे शक्य नाही. यामुळे २०१७-१८ ची संच मान्यता करताना ३० सप्टेंबर रोजी शाळेच्या दाखल-खारीज रजिस्टरवर नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरून शिक्षक संख्या निर्धारित करावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रमेश टपाले, अजय भोयर, प्रदीप महल्ले, पुंडलिक नाकतोडे, देविदास गावंडे, मनोहर वाके, अनिल टोपले, विनय मुलकलवार, गजानन साबळे, धिरज समर्थ, रहिम शाह, दत्तात्रय राऊळकर, पी.के. शेकार, हरिष पुनसे राजू कारवटकर, प्रा. राजेंद्र साळुंके, नरेंद्र मुडे, खुरपडे आदींनी दिला आहे.
नवनवीन नियमांमुळे शिक्षकांच्या अडचणींत वाढ
शिक्षकांच्या २०१७-१८ च्या संच मान्यतेमध्ये नवनवीन नियमांचा अंतर्भाव केला जात आहे. परिणामी, शिक्षकांच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचेच दिसते. आता आधार कार्ड नसलले विद्यार्थी पटसंख्येत ग्राह्य धरत नसल्याची बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे अनेक शाळांतील विद्यार्थी संख्या कमी दिसत असल्याने अतिरिक्त ठरणाºया शिक्षकांची संख्या वाढणार आहे.