राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवरुन व्हायरल झाला उमेदवारांचा सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 08:04 PM2019-09-23T20:04:43+5:302019-09-23T20:07:35+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवर वर्धा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या नावासह जातीनिहाय सर्व्हे सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकशाहीचा उत्सव सुरु होताच राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. अद्यापही पक्षांकडून उमेदवारांची अधिकृतरित्या घोषणा झाली नसल्याने अनेक इच्छुकांच्या बेडूक उड्या सुरुच आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवर वर्धा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या नावासह जातीनिहाय सर्व्हे सोशल मिडीयावर व्हायरल केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या सोशल मिडीया सेलने पोलीस अधीक्षकांसह शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
सोमवारी सकाळपासूनच आरएसएस असे नमुद असलेल्या मोबाईल क्रमांकावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या लेटर हेडवरुन २० सप्टेंबर २०१९ ही तारीख नमुद असलेला आंतरिक सर्व्हे ४७-वर्धा विधानसभा मतदार संघ या शिर्षकाखाली चार इच्छुक उमेदवारांच्या नावाने जातीनिहाय व्हायरल करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने हा सर्व्हे व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांमुळे भाजपातीलही काही पदाधिकाऱ्यांसह स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांकडे शहानिशा केली. तेव्हा त्यांना असा कोणताही सर्व्हे संघाने केला नाही, असे कळले. त्यामुळे हा प्रकार अनधिकृत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करण्याचा आणि राजकीय वातावरण गढूळ करण्याचा असल्याने याप्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शाखा वर्धेचे नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख, धनंजय भट, निलेश मुंजे, सारंग परिमल, मेघजित वझे यांच्यासह भारतीय जतना पक्षाच्या सोशल मिडीया सेलचे जिल्हा संयोजक श्रीनिवास मोहता, प्रणव जोशी, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, कपिल शुक्ला, वर्धा विधानसभाप्रमुख जयंत कावळे, माधवराव वानखेडे, जगदीश टावरी, राकेश मंशानी, गिरीश कांबळे, राहूल करंडे, सुमित गांजरे आदींनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
या क्रमांकावरुन व्हायरल झाला सर्व्हे
सोमवारी सकाळपासूनच वर्धा विधानसभा मतदार संघातून भाजपाकडे तिकीट मागणाºया चार उमेदवारांच्या नावाने जातीनिहाय आंतरिक सर्व्हे सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला. विशेषत: ९६२५१६३४६५, ९६२५९३६१९६,९६२५८४४९७५ व ९३५४४२९७४५ या क्रमांकावरुन शहरातील अनेकांच्या व्हाट्सअॅपवर हा सर्व्हे व्हायरल करण्यात आला. या क्रमांकाचा तक्रारीतही उल्लेख करण्यात आला असून यावर संपर्क साधला असता हे सर्व क्रमांक बंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या क्रमांकावरुन आरोपींचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहेत.
निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवारासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून असा प्रकारे कोणताही सर्व्हे केला जात नाही. हा संदेश जाणीवपूर्वक व खोडसाळवृत्तीने प्रसारीत करण्याचा उद्देश दिसून येत आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्या क्रमांकाचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी.
- डॉ. प्रसाद देशमुख, नगर संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शाखा वर्धा