मेणबत्ती मार्च व निर्भया मॉर्निंग वॉकद्वारे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 10:05 PM2017-08-22T22:05:27+5:302017-08-22T22:08:25+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला चार वर्षे तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्षे झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला चार वर्षे तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्षे झाली. याबाबत १९ आॅगस्ट रोजी मेनबत्ती पेटवून तर चार वर्षे पूर्ण झाल्याच्या; पण खुनी व सुत्रधार न मिळाल्याचा निषेध म्हणून सकाळी ८ वाजता ‘निर्भया मॉर्निंग वॉक’चे आयोजन करीत निषेध नोंदविण्यात आला.
शनिवारी सायंकाळी डॉ. आंबेडकर ते गांधी पुतळा असा मार्च काढून महात्मा गांधी पुतळ्याजवळ आदारांजली वाहून निषेध व्यक्त केला गेला. रविवारी हत्येला चार वर्षे पूर्ण होऊन सीबीआयने मारेकरी व सुत्रधार न पकडल्याचा तथा हत्यारे सनातन संस्थेचे साधक आहे, हे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात देऊनही कार्यवाही न झाल्याने केंद्र व राज्य शासन तथा सीबीआयचा निषेध केला. सकाळी शिवाजी चौक ते बजाज चौक ते इतवारा येथून मार्च काढला. घोषणा देत व हातात निषेधाचे फलक घेऊन शिवाजी चौक येथे सांगता करण्यात आली. यात सुधीर पांगुळ, विलास काळे, डॉ. चेतना सवाई, बाबाराव किटे, डॉ. माधुरी झाडे, सारिका डेहनकर, अॅड. पूजा सुरकार, पोटदुखे, सुनील ढाले, प्रकाश कांबळे, गजेंद्र सुरकार, डफळे आदी सहभागी झाले.
हिंसा रक्तात नसते, डोक्यात भरवली जाते
जगात धार्मिक कारणांतून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात हिंसा झाल्या आहे. हिंसेतून विनाशाशिवाय काही साध्य होत नाही. हिंसेचे अनेक स्वरूप असून हिंसा ही मानवाच्या रक्तात नसते तर ती वेगवेगळ्या कारणांमुळे डोक्यात भरवली जाते. हिंसा थांबवायची असेल तर समाजात न्याय व समता ही मानवी मूल्ये भक्कमपणे रूजविणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक सदस्य तथा राष्ट्रीय अनुसंधान विभागाचे प्रमुख किशोर जगताप यांनी व्यक्त केले.
अनेकांत स्वाध्याय मंदिरात रविवारी ‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अतिथी म्हणून अरुण चवडे, गजेंद्र सुरकार, डॉ. सिद्धार्थ बुटले उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले की, अंधश्रद्धा व हिंसेचा जवळचा संबंध आहे, हे ओळखून वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकरांना शहीद व्हाव लागलं. डॉक्टरांचं बलिदान व्यर्थ जाऊ न देण्यासाठी युवा पिढीला हिंसेपासून परावृत्त करण्यासाठी शिक्षण व्यव्यस्थेत बदल करून हिंसेपासून प्रवृत्त करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करून मानवी मूल्ये रूजविणारी व्यवस्था उभी करणे व धर्मनिरपक्षेतेचे मूल्य भक्कमपणे रूजविण्यासाठी गरजही त्यांनी व्यक्त केली. हिंसेला नकार देण्यासाठीच संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाल्याचे ते बोलत होते. प्रास्ताविक सारिका डेहनकर यांनी केले.