दक्षिणेतून येतोय वर्ध्यात गांजा; झुरके ओढणारे ११ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 05:03 PM2020-10-05T17:03:28+5:302020-10-05T17:03:56+5:30
Wardha News Drugs Cannabis वर्ध्यातील पोलिसांनी चक्क गांजाचे झुरके ओढणाऱ्यांवरही कारवाई केली. ११ युवकांना अटक केली असून अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आतापर्यंत गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाली हे सर्वश्रुत होते. मात्र, वर्ध्यातील पोलिसांनी चक्क गांजाचे झुरके ओढणाऱ्यांवरही कारवाई केली. ११ युवकांना अटक केली असून अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. हा गांजा दक्षिण भागातून वर्ध्यात येत असल्याची लिंक पोलिसांना सापडली असून उपविभागीय पोलीस अधीकारी पियूष जगताप याबाबत सखोल चौकशी करीत आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेत अनेक अभिनेता-अभिनेत्रींचे ‘ड्रग्ज’ कनेक्शन पुढे आले. त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी गांजा पिणाºयांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे ठरविले. त्यानुसार रामनगर पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे आणि सावंगी पोलिसांनी शहरासह लगतच्या परिसरात असलेल्या सर्कस मैदान, स्वावलंबी मैदान, तुकडोजी मैदान, रेल्वे लाईन परिसर, साटोडा टी-पॉर्इंट परिसर आदी ठिकाणी छापे मारुन ११ युवकांना गांजा ओढताना रंगेहात अटक केली. पोलिसांनी शेख मोसीम शेख कासम कनोजे, प्रवीण देविदास परसगाले, निखील अनंत कारमोरे, शेख आसीफ शेख नसीर, रुखेश असलम शेख रफीक, आसीफ खाँ पठाण, शेख अनीस शेख अहमद, पंकज शिवदास झगडकर, बॉबी दिलीप महेशगौरी, गणेश गंगाधर मन्ने यांना अटक करीत त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ, या कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
कर्मचाऱ्यांचे झाले प्रशिक्षण
तीन दिवस चाललेली ही विशेष मोहीम राबविण्यापूर्वी संबंधित ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. कशी कारवाई करायची, लघवीचे नमूने कसे घ्यायचे ते कुठे पाठवायचे, गांजा सेवन करणारा ओळखायचा कसा, याचे प्रशिक्षण देण्यात आले.