उन्हामुळे बाहेर जाता येईना; वीज नसल्याने घरीही बसता येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 05:00 AM2022-04-11T05:00:00+5:302022-04-11T05:00:11+5:30
कमी तोटा, विद्युत चोरी, नियमित वीज देयक भरणे या त्रि-सूत्रीला केंद्रस्थानी ठेवून महावितरणने जी-१, जी-२ व जी-३ असे जिल्ह्यातील विविध परिसराचे विभाजन केले आहे. एरवी प्रती दिवशी १८ ते २० हजार मेगा व्हॅट विजेची मागणी वर्धा जिल्ह्याची असते. पण सध्या ऊन चांगलेच तापत असल्याने आणि अनेकांनी कुलर तसेच एसी सुरू केल्याने विजेची मागणीही वाढली आहे. अशाही परिस्थितीत महावितरण नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील सुमारे साडे तीन लाख ग्राहकांना महावितरण वीज पुरवठा करते. जिल्ह्यात सूर्य आग ओकत असला तरी सद्यस्थितीत महावितरणकडून कुठलेही भारनियमन लागू करण्यात आलेले नाही. लोड वाढल्यावरच विद्युत देयक नियमित न भरणाऱ्या भागात काही तासांकरिता भारनियमन केले जाते. अशाच वेळी उन्हामुळे बाहेर जाता येईना अन् वीज नसल्याने घरीही बसता येईना अशी परिस्थिती नागरिकांवर ओढवते.
कमी तोटा, विद्युत चोरी, नियमित वीज देयक भरणे या त्रि-सूत्रीला केंद्रस्थानी ठेवून महावितरणने जी-१, जी-२ व जी-३ असे जिल्ह्यातील विविध परिसराचे विभाजन केले आहे. एरवी प्रती दिवशी १८ ते २० हजार मेगा व्हॅट विजेची मागणी वर्धा जिल्ह्याची असते. पण सध्या ऊन चांगलेच तापत असल्याने आणि अनेकांनी कुलर तसेच एसी सुरू केल्याने विजेची मागणीही वाढली आहे. अशाही परिस्थितीत महावितरण नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण एखाद्यावेळी लोड वाढल्यावरच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भारनियमन करावे लागत असल्याचे सांगण्यात आले. प्रती दिवशी ३५ हजार मेगा व्हॅटपेक्षा जास्त विजेची मागणी राहिल्यास नाईलाजाने वर्धेकरांवर भारनियमनाचे संकटच ओढवणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विजेचा जपूनच वापर करण्याची गरज आहे.
दोन दिवसांपूर्वी राहिली विक्रमी मागणी
- जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्याची विजेची मागणी तब्बल २८ हजार मेगा व्हॅट राहिली असून तशी नोंद महावितरणने घेतली आहे. विशेष म्हणजे एरवी प्रतीदिवशी १८ ते २० हजार मेगाव्हॅट विजेची मागणी राहत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असल्याने विजेच्या मागणीतही वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याची वीज मागणी २८ हजार मेगाव्हॅट इतकी विक्रमीच राहिली. भारनियमनाचे संकट टाळण्यासाठी नागरिकांनी नियमित देयक अदा करावे.
- अशोक सावंत, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.
इन्व्हर्टरच्या मागणीत होणार वाढ
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात विजेची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यास महावितरणला काही भागात भारनियमन लागू करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत इन्व्हर्टरच्या मागणीत कमालीची वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शहरात ठराविक भागात वीज का जात नाही?
- कमी तोटा तसेच नियमित देयक अदा करणाऱ्या भागाला प्राधान्यक्रमाने नियमित विद्युत पुरवठा देण्याचे महावितरणचे धोरण आहे. त्यामुळेच ज्या भागातील नागरिक किंवा व्यावसायिक वीज चोरीसारखा प्रकार टाळत नियमित देयक अदा करतात त्या भागात महावितरण नियमित विद्युत पुरवठा करते. तर ज्या भागात जास्त तोटा आणि नियमित देयक अदा केली जात नाहीत त्या भागात भारनियमन केले जात असल्याचे सांगण्यात आले.
जास्त तोटा तेथेच भारनियमन
- जास्त तोटा, विद्युत चोरी यासह ज्या भागातील नागरिक नियमित वीज देयक अदा करत नाहीत अशाच शहरी व ग्रामीण भागात लोड वाढल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून भारनियमन लागू केले जाते.
- मध्यंतरी जी-१ आणि जी-२ भागात काही काळाकरिता भारनियमन लागू करावे लागले होते.