कार-दुचाकी अपघातात पत्नी ठार, पती गंभीर
By admin | Published: January 5, 2017 12:34 AM2017-01-05T00:34:20+5:302017-01-05T00:34:20+5:30
शाळेतून परत येत असलेल्या शिक्षक दाम्पत्याच्या दुचाकीला वर्धा-आर्वी मार्गावरील सेवा पाटीजवळ भरधाव कारने समोरासमोर जबर धडक दिली.
कार चालक पसार : जखमी व मृतक शिक्षक
आकोली : शाळेतून परत येत असलेल्या शिक्षक दाम्पत्याच्या दुचाकीला वर्धा-आर्वी मार्गावरील सेवा पाटीजवळ भरधाव कारने समोरासमोर जबर धडक दिली. यात दुचाकीवरील पत्नीचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी असून त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
किरण गायाकवाड (शेळके) असे मृतक महिलेचे नाव असून राजेंद्र गायकवाड रा. वर्धा असे जखमीचे नाव आहे. हे दोघही एकाच शाळेत शिक्षक असून ते वर्धेकडे जात असताना त्यांना एका भरधाव कार चालकाने धडक दिली. कार चालक वाहन सोडून पसार झाला.
राजेंद्र गायकवाड हे एमएच ३२ डब्ल्यु ६७०३ क्रमांकाच्या दुचाकीने पत्नी किरण सोबत खरांगणावरून वर्धेकडे जात होते. दरम्यान, सेवा पाटीजवळ वर्धेवरून येणाऱ्या एमएच ३२ सी ६४५ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात सदर दाम्पत्य गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच आंजी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विनोद राऊत, दिनेश गायकवाड, सचिन पवार व अमर हजारे यांनी तातडीने रुग्णवाहीका बोलावून घटनास्थळी धाव घेतली. दोनही जखमींना उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले; मात्र महिलेची प्रकृती गंभीर असल्याने नागपूर रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. राजेंद्रवर उपचार सुरू आहे. यावेळी कार चालकाने घटनास्थळी पलायन केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून कार चालकाचा शोध सुरू आहे.(वार्ताहर)