कारंजा-दाभा रस्त्याची वाताहत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:01 PM2017-09-28T22:01:35+5:302017-09-28T22:01:53+5:30
शहरातून दाभा गावाकडे जाणारा दीड किमीचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. वाहने तर सोडा, पायी चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावर असणारा रपटाही खचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : शहरातून दाभा गावाकडे जाणारा दीड किमीचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. वाहने तर सोडा, पायी चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावर असणारा रपटाही खचला आहे. यामुळे वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील वाहनांची वाहतूक लक्षात घेता रस्त्याची तथा पुलाची तवरित दुरूस्ती करून तो उंच करणे गरजेचे झाले आहे.
कारंजा येथून व्हाया दाभा, उमरी व गवंडीला जाणारा सुमारे ४ किमी लांबीचा रस्ता जि.प. बांधकाम विभागातर्फे १० वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. निकृष्ट दर्जाचे बांधकाम तथा वाहनांच्या वर्दळीमुळे हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. कारंजा ते दाभा हा दीड किमीचा रस्ता तर खड्डेमय झाला आहे. या रस्त्याने गवंडी, धावसा, सावल, उमरी, लिंगामांडवी आदी गावांतील नागरिकांना कारंजा येथे ये-जा करावी लागते. दुचाकी, अॅटो, चारचाकी वाहने तसेच बसची वाहतूक सतत सुरू असते. यापूर्वी दोन वेळा या रस्त्याची थातूरमातूर दुरूस्ती करण्यात आली; पण टाकलेला मुरूम व गिट्टी एकाच पावसात वाहून गेली. या रस्त्याचे डांबरीकरण करून कायमस्वरूपी दुरूस्ती व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहे. या रस्त्यावर दाभा गावाजवळ नदीवर एक ठेंगणा रपटा बांधला होता. त्या रपट्यावर खड्डे पडले असून कडेला संरक्षक भिंत वा कठडे बांधण्यात आले नाहीत. त्याचप्रमाणे उमरी गावाला जातानाही एका नदीवरील रपटा, कमी उंचीचा असल्याने पुराचे पाणी पुलावरून वाहते. परिणामी, वाहतूक बंद होते. या रपट्यावर मध्यभागी एक मोठे छिद्र पडल्याने तो अपघातास कारणीभूत ठरत आहे. यामुळे रस्त्याच्या दुरूस्तीसह उंच पुलाची निर्मिती करणे गरजेचे झाले आहे.
उमरी या गावातील मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे गावात भाविकांची वर्दळ वाढली आहे. बांधकाम विभागाने कारंजा ते दाभा ते उमरी रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करावपे. या रस्त्यावरील दोन्ही रपटे दुरूस्त करून उंच करावेत व रपट्याच्या संरक्षणार्थ संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी, दाभा तसेच उमरी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तीर्थस्थळाला जाणाºया रस्त्यावरही अवकळा
तालुक्यातील उमरी या गावातील मंदिराला तीर्थस्थळाचा क दर्जा प्राप्त झाला आहे. परिणामी, गावात भेट देणाºया भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. या भाविकांना उमरी येथे येताना खाचखळग्यांतून वाट काढावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविताना अपघाताचा धोका असतो. शिवाय क्षतिग्रस्त रपट्यांमुळेही अपघाताला निमंत्रण मिळते. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत रस्ता तथा पुलाची दुरूस्ती करणे गरजेचे आहे.
आर्वी तालुक्यातील रस्त्यांवरही अवकळा
कारंजासह आर्वी तालुक्यातील रस्त्यांवरही अवकळाच आली आहे. आर्वी ते टाकरखेड रस्ता खड्ड्यांमध्येच रूतल्याची स्थिती आहे. या रस्त्याची अनेकदा दुरूस्ती करण्यात येते; पण सूमार दर्जाच्या कामामुळे अल्पावधीच रस्त्याची दुरवस्था होते. सध्या पावसामुळे टाकरखेड रस्त्याची चाळणीच झाली आहे. आर्वी-पुलगाव मार्गावरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. याकडे लक्ष देत संबंधित कंत्राटदारांवरच कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.