मंत्र्यांच्या साधेपणाने भारावले कारंजावासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:56 AM2019-01-12T00:56:57+5:302019-01-12T00:57:35+5:30
राष्ट्रीय महामार्ग सहावरील कारंजा (घा) येथे तहसील कार्यालयाच्या शेजारी प्रसिद्ध अंबादास चहा, कॉफी कॅन्टीन आहे. या ठिकाणी आजवर अनेकांनी कॉफी, चहाचा आस्वाद घेतला. त्यामुळे येथील कॉफी, चहा प्रसिद्धीस पावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : राष्ट्रीय महामार्ग सहावरील कारंजा (घा) येथे तहसील कार्यालयाच्या शेजारी प्रसिद्ध अंबादास चहा, कॉफी कॅन्टीन आहे. या ठिकाणी आजवर अनेकांनी कॉफी, चहाचा आस्वाद घेतला. त्यामुळे येथील कॉफी, चहा प्रसिद्धीस पावला आहे. यामुळेच की काय चक्क मंत्र्यांना कॉफीचा मोह आवरला नाही. कॅन्टीनला पशुसंवर्धनमंत्री जानकरांनी भेट देत कॉफीचा आस्वाद घेतला.
महामार्गाने ये-जा करणारे प्रवासी नित्याने या ठिकाणी थांबून चहा-कॉफी घेतात आणि मगच पुढील प्रवासाला निघतात. यापूर्वी पशुसंवर्धन मंत्रीमहादेव जानकर यांनी या कॅन्टीनमधील कॉफीचा आस्वाद घेतला. असेच गुरुवारी नागपूर येथून अमरावतीला जात असताना पुन्हा एकदा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी प्रसिद्ध कॉफी कॅन्टीनवर थांबा घेत कॉफीचा आस्वाद घेतला. काही महिन्यांपूर्वी कॉफी आणि चहा पूर्णपणे बंद केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर येथून अमरावतीला कार्यक्रमानिमित्त जात असताना कारंजा शहरातून समोर निघून गेले. पुढे गेल्यानंतर त्यांना कॉफी पिण्याची तलब आली. दरम्यान, त्यांनी माघारी येत थेट कॅन्टीन गाठली. कॉफी घेण्यासाठीच समोरून परत आले, असे कॅन्टीनमालक अंबादास ठवळे यांना सांगितले. कॉफीचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांचा ताफा पुढील प्रवासाकरिता रवाना झाला.
२२ कोटींतून होणार केंद्राचा विकास
तालुक्यातील हेटीकुंडी येथे राज्यातील एकमेव गवळाऊ पशुपैदास केंद्र आहे. या केंद्राची दुर्दशा झाल्याचे स्वत: अनुभवले. आता या केंद्राचा २२ कोटी रुपयांच्या निधीतून विकास केला जाणार आहे, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकारांनी यावेळी जाहीर केले.