ऑनलाइन पार्सल उघडताय; व्हिडिओ रेकॉर्डिंग नक्की कराच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 03:40 PM2021-10-28T15:40:30+5:302021-10-28T15:47:13+5:30
ऑनलाइन पार्सल कुरिअर ऑफिसमध्ये जाऊन रिटेलरसमोर व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पार्सल उघडावे. फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तर थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सायबर सेलमध्ये जाऊन पुरावा म्हणून व्हिडिओ दाखवावे.
वर्धा : सणासुदीच्या दिवसांत अनेक जण ऑनलाइन पार्सल मागवितात. मात्र, मागवलेले पार्सल दुसरेच येत असल्याने अनेकांची फसवणूक झाली आहे. नागरिकांची पार्सलमध्ये फसवणूक झाल्यास थेट सायबर सेलशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.
अनेकजण ऑनलाइनमार्फत विविध वस्तू, कपडे बोलावितात. अनेक जण कॅश ऑन डिलिव्हरी, तर कुणी ऑनलाइन पेमेंट करतात. काही दिवसांत वस्तू कुरिअर बॉयकडून घरपोच आणली जाते. परंतु, अनेकांना मागविलेली वस्तू भलतीच निघत असल्याने त्यांची फसवणूक होते. तर, मागविलेली वस्तू परत पाठविण्यासाठी लांब प्रक्रिया असल्याने अनेकजण आपली फसवणूक झाली असे समजून परत येतात. मात्र, अशांनी आता मागे न येता कुरिअर ऑफिसमध्ये जाऊन रिटेलरसमोर व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पार्सल उघडावे, जर फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तर थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सायबर सेलमध्ये जाऊन पुरावा म्हणून व्हिडिओ दाखवावा, जेणेकरून अशा ठगबाजांवर आळा बसेल.
पार्सलमधून फसवणुकीच्या तक्रारी
ऑनलाइन वस्तू मागविली असता त्यात भलतीच वस्तू येत असल्याने अनेकांची फसवणूक होते. मात्र, काही सुजाण नागरिक याबाबत थेट सायबर सेल गाठून तक्रारी देतात. जिल्ह्यात पार्सलमधून फसवणूक झाल्याच्या काही तक्रारीदेखील सायबर सेलकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. मात्र, कुरिअर ऑफिसमध्ये जात पार्सल त्यांच्या समक्ष उघडून त्याचा व्हिडिओ पुरावा म्हणून जवळ असल्यास कारवाई करण्यास मदत होते. मात्र, नागरिकांनी अशा फेक ऑनलाइन साइटसपासून सावध राहण्याची नितांत गरज आहे.
पार्सल घेण्यापूर्वी घ्यावी काळजी
पार्सल घेण्यापूर्वी ते पार्सल कुठून आले, कुणाच्या नावाने आहे, याची तपासणी करण्याची गरज आहे. कुरिअर बॉयसमोर पार्सल फोडल्यास ती जबाबदारी नागरिकांची असते. त्यामुळे कुरिअर ऑफिसमधूनच पार्सल नागरिकांनी घेऊन जावे, तेथील रिटेलरसमोर पार्सल उघडून त्याचा व्हिडिओ घेण्याची गरज आहे. आपण कोणत्या वेबसाइटवरून पार्सल बोलाविले आहे, याची खातरजमा करण्याची गरज आहे. सोशल मीडियावर अशा अनेक फेक वेबसाइटस उपलब्ध असून, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
फसवणूक झालीच तर...
ऑनलाइन पार्सल बोलाविल्यानंतर भलतीच वस्तू आली तर थेट कुरिअर रिटेलरशी संपर्क साधावा, पुरावा म्हणून पार्सल उघडताना त्याचा व्हिडिओ घ्यावा किंवा कुरिअर बॉयसमोरच पार्सल उघडावे, जर फसवणूक झाली असेल, तर थेट जवळील पोलीस ठाणे किंवा सायबर सेलशी संपर्क साधण्याची गरज आहे.