ट्रकच्या धडकेत मालवाहूचा चक्काचूर; ट्रकचालक घटनास्थळाहून पसार
By चैतन्य जोशी | Updated: March 6, 2023 15:48 IST2023-03-06T15:43:44+5:302023-03-06T15:48:21+5:30
आजंती शिवारात रात्री अपघात

ट्रकच्या धडकेत मालवाहूचा चक्काचूर; ट्रकचालक घटनास्थळाहून पसार
वर्धा : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने समोरील मालवाहूला जबर धडक दिली. या अपघातात मालवाहूचे केबीन चक्काचूर झाले असून मोठे नुकसान झाले. हा अपघात ५ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आजंती शिवारात असलेल्या खर्डा कंपनी समोरील रस्त्यावर झाला. अपघात होताच ट्रकचालकाने पळ काढला.
हिंगणघाट पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ४० सी.डी. ५०५३ क्रमांकाच्या ट्रक चालकाने निष्काळजीपणे व हयगयीने ट्रक चालवून समोरुन येणाऱ्या एम.एच. ३२ क्यू. ५२८० क्रमांकाच्या मालवाहूला जबर धडक दिली. या धडकेत मालवाहूच्या केबीनचा चक्काचूर झाला असून चालक राकेश हा जखमी झाला. अपघात होताच ट्रकचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.
याबाबतची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी जात पंचनामा करुन विस्कळीत असलेली वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल केला.