सावंगीच्या पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल
By Admin | Published: June 9, 2017 01:59 AM2017-06-09T01:59:41+5:302017-06-09T01:59:41+5:30
दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या तक्रारदाराची दुचाकी ठाण्यात जमा न करता स्वत:कडे ठेऊन ती सोडण्यासाठी
दारूच्या गुन्ह्यातील दुचाकी सोडण्यासाठी लाचेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या तक्रारदाराची दुचाकी ठाण्यात जमा न करता स्वत:कडे ठेऊन ती सोडण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करणाऱ्या सावंगी पोलीस ठाण्यातील हवालदार भारत अलोणे याच्यावर चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. याप्रकरणी गुरुवारी सावंगी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सुत्रानुसार, अलोणे याने दारूबंदीच्या गुन्ह्यात पकडलेली दुचाकी देण्याकरिता १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती; परंतु तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीची २० मे रोजी पडताळणी करण्यात आली. यात भारत अलोणे याने तडजोड करून पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले. यावरून अलोणे याच्याविरूद्ध सावंगी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक दिनकर कोसरे, पोलीस निरीक्षक रामजी ठाकूर, सारीन दुर्गे, अभय दाभाडे, हवालदार संजय खल्लारकर, महिला कर्मचारी रागीनी हिवाळे, प्रतीभा निनावे, शिपाई कुणाल डांगे, अतुल वैद्य, विजय उपासे यांनी केली.