आधार कार्डच्या नावावर अंगठा घेत केली धान्याची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 10:14 PM2017-08-24T22:14:07+5:302017-08-24T22:14:35+5:30
तालुक्यातील सालई (पेवठ) येथील स्वस्त धान्य दुकानदाराने ग्रामपंचायत समोर राशनकार्ड धारकांचे आधारकार्डसोबत लिंक करायचे असे म्हणत अंगठे घेत धान्याची उचल केल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तालुक्यातील सालई (पेवठ) येथील स्वस्त धान्य दुकानदाराने ग्रामपंचायत समोर राशनकार्ड धारकांचे आधारकार्डसोबत लिंक करायचे असे म्हणत अंगठे घेत धान्याची उचल केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर अंगठे घेणाºया नागरिकांच्या नावे बिले तयार केली. हा प्रकार उघड होताच, फसवणूक झाल्याचे म्हणत ग्रामस्थांच्यावतीने तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे. हा प्रकार गुरुवारी घडला.
गुरुवारला स्वस्त धान्य दुकान चालकाने आम्हाला पाठविले आहे, असे सांगून दोन युवक गावात आले. त्यांनी आम्हाला दुकानमालकाने पाठविले असल्याचे सांगितले व मशीनवर अंगठे घेतले. मात्र त्यांच्याकडून रक्कम घेतली नाही. त्यामुळे गावकºयांना धान्य मिळणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात घोळ करून गावकºयांना धान्यमालापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम घाटोळे यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली असून चौकशीची मागणी केली आहे. या तक्रारीवरून तहसील कार्यालयाच्यावतीने काय कारवाई करण्यात येते याकडे गावकºयांचे लक्ष लागले आहे. या प्रकारातून सुरू असलेला धान्याच्या काळा बाजार थांबविणे गरजेचे आहे.
दुकान मालक म्हणतो; प्रायोगिक तत्त्वावर अंमल
आधार कार्ड शिधापत्रिकेला लिंक करण्यासाठी मी प्रशिक्षित दोन मुलांना हा प्रयोग करून पाहायला लावला. बिले बनविली परंतु ती शिधापत्रिका धारकांना दिली नाही व रक्कमही घेतली नाही. लिंक करण्याची ही पहिली वेळ आहे. आज बिले बनविण्याचे काम करुन उद्या सर्वांना धान्य द्यायचे हा माझा प्राथमिक हेतू आहे. लिंकींगचे काम अजून आम्हाला करता येत नाही. म्हणून त्या प्रशिक्षित युवकांची मदत घेतली. कुणाला बिल दिले नाही, पैसे घेतले नाही व धान्यमाल ही दिला नाही. उद्या सर्वांना धान्यमाल वाटणार असल्याचे दुकान चालकांनी बोलतांना सांगितले.