धारदार शस्त्राने पर्स कापून २८ हजारांची रोकड लंपास; बाजारपेठेतील घटनेने खळबळ
By चैतन्य जोशी | Updated: February 28, 2023 17:19 IST2023-02-28T17:17:50+5:302023-02-28T17:19:30+5:30
शहर ठाण्यात गुन्हा दाखल

धारदार शस्त्राने पर्स कापून २८ हजारांची रोकड लंपास; बाजारपेठेतील घटनेने खळबळ
वर्धा : बॅंकेतून ३० हजारांची रक्कम काढून ती पर्समध्ये ठेवली. त्यानंतर बाजारपेठेत खरेदी करण्यास गेलेल्या महिलेच्या पर्सची एक बाजू अज्ञात चोरट्याने धारदार शस्त्राने चिरुन पर्समधील २८ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केली. ही घटना बाजारपेठेत उघडकीस आली. याप्रकरणी २७ रोजी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
निर्मला बबन माने (५०) रा. स्टेशनफैल ही मैत्रीणीसह बॅचलर रोडवर असलेल्या स्टेट बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेली होती. बॅंकेतून ३० हजार रुपयांची रोकड विड्राॅल करुन त्यातील दीड हजार रुपये वेगळे काढून २८ हजार ५०० रुपयांची रक्कम हॅण्डबॅगमध्ये ठेवली. त्यानंतर दोघीही पायदळ बाजारात खरेदीसाठी गेल्या.
एका स्टीलच्या दुकानातील रॅक खरेदी करण्यासाठी हॅण्डबॅगमधील पैसे काढत असतानाच तिला बॅगची एक बाजू चिरलेली दिसून आली. बॅगची पाहणी केली असता अज्ञात चोरट्याने बॅगमधील २८ हजार ५०० रुपयांची रोकड चोरुन नेलेली दिसून आली. याप्रकरणी निर्मला माने यांनी शहर पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.