कृषी केंद्रातून पळविली रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:23 PM2018-07-12T23:23:56+5:302018-07-12T23:25:54+5:30
रात्रीच्या सुमारास मुख्य मार्गावरील कुलूपबंद कृषी केंद्राला टार्गेट करून अज्ञात चोरट्याने त्या व्यावसायिक प्रतिष्ठानातून ३८ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रात्रीच्या सुमारास मुख्य मार्गावरील कुलूपबंद कृषी केंद्राला टार्गेट करून अज्ञात चोरट्याने त्या व्यावसायिक प्रतिष्ठानातून ३८ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप पुरुषोत्तम जाजोदीया यांच्या मालकीचे मुख्य मार्गावर शहर पोलीस ठाण्यासमोर कृषी केंद्र आहे. बुधवारी ते व त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे रात्री व्यावसायिक प्रतिष्ठान बंद करून घरी गेले. दरम्यान रात्री उशीरा अज्ञात चोरट्याने त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातून रोख ३८ हजार रुपये चोरून नेले. गुरूवारी सकाळी ८ वाजता जाजोदीया हे नेहमीप्रमाणे व्यावसायिक प्रतिष्ठान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच शहर ठाण्यातील सुधाकर पचारे व संदीप चौरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. दिलीप जाजोदीया यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाकेच्या अंतरावरच पोलीस ठाणे
मुख्य मार्गावरील ज्या कृषी केंद्रात चोरी झाली त्या कृषी केंद्रापासून शहर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. पोलीस ठाण्यापासूनच हाकेच्या अंतरापर्यंतच्या परिसरात चोरी झाल्याने शहर पोलिसांच्या कार्यप्रणालीबाबत घटना स्थळी उलट-सुटल चर्चा होत होती. शिवाय नागरिकांकडून आश्चर्यही व्यक्त केले जात होते. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
रोखसह मोबाईल लंपास
हिंगणघाट : येथील शास्त्री वॉर्डातील मोहन रामदास हजारे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने रोख २० हजार रुपयांसह एक मोबाईल लंपास केला. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. हजारे कुटुंबिय घरी झोपून असताना अज्ञात चोरट्याने स्वयंपाक घरातील खिडकीतून प्रवेश करून घरातून एकूण २३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
सोन्याचे दागिने पळविले
अज्ञात चोरट्यांनी वर्धा शहरातील रामनगर तुकाराम वॉर्ड भागातील निलेश शास्त्रकार यांच्या घरातून रोखसह सोन्याचे दागिने असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
चोरट्यांनी शास्त्रकार यांच्या घरातून रोख २ हजार ५०० रुपये, २ ग्रॅमची सोन्याची अंगठी, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, ४ ग्रॅमचे सोन्याचे डारले असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरट्यांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळजाईनगर येथील मांडवकर यांच्या घरातूनही ऐवज लांबविला. शिवाय एका घरी चोरीचा प्रयत्न केल्याची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.