कॅशलेस एटीएमने ग्राहक त्रस्त
By Admin | Published: March 20, 2017 12:46 AM2017-03-20T00:46:20+5:302017-03-20T00:46:20+5:30
येथील एटीएम गत चार ते पाच दिवसापासून बंद असल्याने एटीएम कार्ड धारक नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
रोकडसाठी करावी लागते भटकंती: वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी
सेवाग्राम : येथील एटीएम गत चार ते पाच दिवसापासून बंद असल्याने एटीएम कार्ड धारक नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. एटीएमकक्ष विविध कारणांनी बंद राहत असून पैसे नसल्याचे तसेच बिघाडीचे कारण सांगण्यात येते. एटीएम कक्ष बंद राहत असल्याने रोकडसाठी नागरिकांना सुरू असलेल्या एटीएमचा शोध घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
नागरिकांचे अधिकोषात खाते असल्याने सर्वांना एटीएम कार्ड मिळाले आहे. कार्डधारक आवश्यक तेवढीच रक्कम खिशात वापरतात. गेल्या काही दिवसांपासून एटीएम बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना आर्थिक व्यवहार करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
मेडिकल चौकात तीन, आश्रम मार्गावर एक, पेट्रोल पंपाजवळ एक आणि कस्तुरबा रुग्णालयात एक असे सहा एटीएम आहे. पण यात सेंट्रल बँकचे एक वगळता अन्य बंद आहे.
स्टेट बँकेच्या एटीएमची मशीनमध्ये तांत्रिक झाल्याचे सांगण्यात येते. या बाबतच सर्वात जास्त तक्रारी आहेत. नव्याने आश्रम समोर बँक आॅफ इंडियाचे एटीएम उघडल्या ने कार्ड धारक या ठिकाणी मोठ्या आशेने येतात. परंतु, एटीएममध्ये पैसेच राहत नसल्याने निराशा पदरी पडत आहे. एटीएम बंद राहत असल्याची वेगवेगळी कारणे सांगितली जात असली तरी ज्या बँक खातेदारांकडे एटीएम कार्ड आहे त्यांना सध्या नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)