जात पंचायतीची दहशत; वर्धा जिल्ह्यातील कुटुंबावर नऊ वर्षांपासून बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 02:20 PM2019-02-20T14:20:31+5:302019-02-20T14:22:58+5:30
जात पंचायतीच्या जाचामुळे मागील नऊ वर्षांपासून वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील रमेश धुमाळ यांचा परिवार दहशतीत जीवन जगत आहे.
अभिनय खोपडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जात पंचायतीच्या जाचामुळे मागील नऊ वर्षांपासून वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील रमेश धुमाळ यांचा परिवार दहशतीत जीवन जगत आहे. समाजातील पंचायतीपुढे अनेकदा विनंत्या करूनही समाजाने त्यांच्यावरील सामूहिक बहिष्कार मागे न घेतल्याने धुमाळ यांची समाजातच मोठी कोंडी करण्यात आली आहे. याविरूध्द आता कायदेशीर लढा लढण्याचा निर्णय धुमाळ यांनी घेतला आहे.
२१ फेब्रुवारी २०१० रोजी रमेश धुमाळ यांचे लग्न झाले. यावेळी समाजाचे सर्व लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. परंतु कालांतराने त्यांच्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील (गोंधळी जोशी) समाजातील पंचमंडळींनी रमेश व त्यांचे सासरकडील मंडळीवर सामाजिक बहिष्कार टाकला. याबाबत रमेश यांनी चौकशी केली व समाजातील लोकांना विचारले तर तुझ्या सासऱ्याला बाट आहे, तुझी सासू समाजाची नाही, त्यामुळे आम्ही त्यांना दंड ठोठावला आहे. आणि तू त्या कुटूंबातील मुलगी केली असल्यामुळे तूही गुन्हेगार आहे. म्हणून तुलाही बहिष्कृत करण्यात येत आहे. तुला दंड भरावा लागेल, असा दम दिला. त्यानंतर समाजाच्या या भूमिकेमुळे हादरलेल्या रमेश यांनी रायपूर (छत्तीगड) येथील जात पंचायतीमध्ये हजेरी लावली. तेथे रमेश व त्यांच्या सासरकडील मंडळींवर प्रत्येक पाच हजार रूपये असा दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला. यावेळी घाबरलेल्या स्थितीत त्यांनी दहा हजार रूपये दंड भरण्याची तयारी दाखविली. परंतु त्यांना दंड भरू न देण्यासाठी परावृत्त करण्यात आले व आता जास्त गावांची मंडळी आलेली नाही. जेव्हा ती येईल, तेव्हा न्याय करू असे सांगण्यात आले. त्या दिवसापासून आजपर्यंत न्यायासाठी याचना करीत असलेल्या रमेश धुमाळ यांना न्यायच मिळालेला नाही. जात पंचायतीच्या अनेक सदस्यांकडे चकरा करून विनंती केली. परंतु ते पंच मानण्यासाठी तयार नाही. या जात पंचायतीत नागपूर येथील तीन, अकोला येथील दोन व बिलासपूर (छत्तीसगड) येथील एका पंचाचा समावेश असल्याची माहिती धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गावोगावी जात पंचायतीत बोलावून अपमानित करण्याचे काम समाजाकडून सुरू असल्याचे रमेश धुमाळ यांनी सांगितले. आपल्याला सन्मानाची वागणूक समाजातच मिळाली पाहिजे. यासाठी आपण आता लढा देण्याचा निश्चय केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याप्रकरणात तक्रार शासनाने दाखल करून घेवून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.
२०१० पासून आपल्यावर व आपल्या सासरकडील मंडळीवर समाजाने सामूहिक बहिष्कार घातला आहे. दहा हजाराचा दंड ठोठावला. तो भरण्याची तयारीही जात पंचायतीसमोर दाखविली. मात्र तो भरू नये यासाठी ठिकठिकाणी आम्हाला जात पंचायतीसमोर बोलाविले जात आहे व अपमानीत केले जात आहे. समाजाच्या दहशतीमुळे आजवर आम्ही यासंदर्भात तक्रारही केली नाही. मात्र आता असह्य त्रास होत असल्याने कायदेशीर लढा लढण्याचा निश्चय आपण केला आहे. यासाठी इतर समाजाने आम्हाला साथ द्यावी.
- रमेश धुमाळ, पिडीत, देवळी, जि. वर्धा