जागेअभावी गुरांचा बाजार धोक्यात
By admin | Published: May 10, 2017 12:45 AM2017-05-10T00:45:05+5:302017-05-10T00:45:05+5:30
समुद्रपूर तालुकास्थळावरील बाजार हा परिसरातील नागरिकांकरिता पर्वणी ठरणारा आहे. येथे भरणारा गुरांचा बाजारही हिच ओळख ठेवून होता.
बाजाराच्या जागेवर शासकीय कार्यालयांचे अतिक्रमण : १९५१ पासूनचा इतिहास लुप्त होण्याच्या मार्गावर
सुधीर खडसे।
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर तालुकास्थळावरील बाजार हा परिसरातील नागरिकांकरिता पर्वणी ठरणारा आहे. येथे भरणारा गुरांचा बाजारही हिच ओळख ठेवून होता. आज वाढत्या सुविधांमुळे हा बाजार लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. बाजाराच्या जागांवर शासकीय कार्यालयाच्या इमारतींनी अतिक्रमण केल्याने बाजार धोक्यात आला आहे.
येथील बाजाराची परंपरा ठिकठिकाणी यात्रेसारखीच आहे. लोकांच्या उपजीविकेसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीचा हा दिवस मुख्य मानल्या जात होता. या बाजारात विविध जातीची जनावरे, शेतीपयोगी वस्तू, बोरे, फाटे, टोपले यासाठी ख्यातीप्राप्त आहे. हा बाजार भरण्याला जनपत सभेच्या काळापासून (१९५१) प्रारंभ झाला असून भोसले महाराज यांचा बाजाराला राजाश्रय लाभला होता.
आठ एकर परिसरात भरत आलेल्या या भव्य बाजाराची महाराष्ट्र शासनाच्या गॅजेट मध्ये नोंद आहे. दोन दशकापूर्वी गीर, लालकंधार, गवळाऊ, पंढरपूरी, जरशी, मुरर्रा अशा गायी, म्हशी, शेळ्या व बैलांच्या वेगवेगळ्या जाती मोठ्या प्रमाणात विदर्भ, मराठवाडा, नायगाव, मोहोपा, हाडी अशा विविध ठिकाणाहून समुद्रपूर येथे खरेदी विक्री साठी येत होते. शेतोपयोगी जनावरे व इतर साहित्य खरेदीविक्रीकरिता शेतकरी हजेरी लावत.
आता या बाजाराच्या जागेवर तहसील, ट्रेझरी, भूमी अभिलेख कार्यालयाने कब्जा केला आहे. तहसील कार्यालयाने पक्की सरंक्षण भिंत उभारून बैलबंडीचा मुख्य रस्ता बंद केला. याबाबत नगरपंचायत उपाध्यक्ष रवींद्र झाडे, पाणीपुरवठा सभापती गजानन राऊत, गटनेता मधुकर कामडी यांनी तहसीलदार व आमदारांना रस्ता ठेवण्याबाबत निवेदन दिले आहे. दुसरीकडे बाजारात येण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्यावर दुकानदाराने आपली दुकाने पुढे सरकवीत रस्त्यावर साहित्य ठेवल्याने हा रस्ता अरूंद झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यशून्यतेमुळे हा बाजार धोक्यात आला आहे.