शहरात पशुगणना ढेपाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:02 PM2019-04-15T22:02:19+5:302019-04-15T22:03:30+5:30
सुरुवातीपासूनच या अन् त्या कारणाने चर्चेत राहिलेली २० वी पशुगणना आता शहरीभागात ढेपाळल्याचे दिसून येत आहे. पशुसंवर्धन विभागाला पाहिजे तसे सहकार्य शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळत नसल्याने तब्बल ३८ हजार १५० च्यावर गृहभेटी शिल्लक आहेत.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुरुवातीपासूनच या अन् त्या कारणाने चर्चेत राहिलेली २० वी पशुगणना आता शहरीभागात ढेपाळल्याचे दिसून येत आहे. पशुसंवर्धन विभागाला पाहिजे तसे सहकार्य शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळत नसल्याने तब्बल ३८ हजार १५० च्यावर गृहभेटी शिल्लक आहेत. परिणामी ही पशुगणना पुन्हा एकदा नागरिकांसह पशुपालकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. सदर प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे गरजेचे आहे. परंतु, विविध कारणांमुळे काम पूर्ण न झाल्याने मुदतवाढ देण्यात आली. मुदत वाढ मिळाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने पुन्हा नव्या जोमानेच काम हाती घेऊन त्यावर कृती केली. परिणामी, मे महिन्यांत पशुगणनेच्या कामात वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी राहिला.
तर सध्या वर्धा जिल्हा राज्यात तिसºया स्थानी असल्याचे सांगण्यात येते. परंतु, वर्धा जिल्ह्यातील पशुगणनेचे १०० टक्के काम पूर्ण होण्यासाठी शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे न मिळणारे सहकार्य कारणीभूत ठरत आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या या पशुगणनेदरम्यान प्रगणकांकडून टॅबच्या सहाय्याने पशुची माहिती गोळा केली जात आहे. प्रगणकांना अडचणी येत असल्याने सदर टॅबमधील २.० वर्जन बदलवून ३.० हे वर्जन टॅबमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, सध्या शहरी भागात पशुगणनेचे काम रेंगाळल्याचे दिसून येत आहे.
राज्यात वर्धा तिसऱ्या स्थानी
मार्च महिन्यात २० व्या पशुगणनेच्या कामात वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी होता. तर त्यानंतर युद्धपातळीवर काम झाल्याने वर्धा जिल्ह्याने भरारी घेत तिसऱ्या स्थान पटकाविले आहे. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात १०४.४९ टक्के काम झाले असून ग्रामीण भागात यशस्वी काम करण्यात राज्यात वर्धा जिल्हा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु, वर्धा जिल्ह्यातील शहरी भागात पाहिजे तसे काम न झाल्याने शहरी गटात वर्धा आठव्या स्थानी आहे. मात्र, शहरी व ग्रामीण याचा एकत्र विचार केल्यास वर्धा जिल्हा सध्या राज्यात तिसºया स्थानी असल्याचे सांगण्यात आले.
‘आतातरी... कसेतरी’चा फार्मूला?
पशुगणना पूर्ण करण्यासाठी टॅब उपलब्ध करून देत ३१ डिसेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. परंतु, या कालावधीत पशुगणनेचे काम पूर्ण न झाल्याने पशुगणना पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. मात्र, सदर वाढीव मुदतीतही काम पूर्ण न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा पशुगणना पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. परिणामी, पशुगणना पूर्ण करण्यासाठी जबाबदार बड्या अधिकाऱ्यांकडून ‘आतातरी...कसेतरी’चा फार्मूला तर राबविल्या जात नाही ना, असा प्रश्न सुजान नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
२,८३,२३३ गृहभेटी पूर्ण
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील आकडेवारीनुसार वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात २ लाख २२ हजार ३० तर शहरी भागातील ६१ हजार २०३ गृहभेटी प्रगणकांनी करून पशुंची माहिती टॅबद्वारे भरली आहे. वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागातील पशुगणना पूर्ण करण्यात आली असून २०११ च्या जनगणनेनुसार शहरी भागातील तब्बल ३८ हजार १५० गृहभेटी शिल्लक आहेत.
वर्धा जिल्ह्यात ३ लाख ९ हजार ८४६ घरे
२०११ च्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात २ लाख १२ हजार ४९३ तर शहरी भागात ९७ हजार ३५३ घरे असल्याची नोंद घेण्यात आली आहे. याच जनगणनेचा आधार घेत सध्या २० वी पशुगणना पूर्ण केली जात आहे.