जनावरे घेऊन जाणारा ट्रक पलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:39 AM2017-08-03T02:39:25+5:302017-08-03T02:39:44+5:30
जनावरे घेऊन जाणाºया ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी वाहन जप्त केले. शिवाय ३२ गुरे ताब्यात घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : जनावरे घेऊन जाणाºया ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी वाहन जप्त केले. शिवाय ३२ गुरे ताब्यात घेण्यात आली. यातील दोन गुरांचा मृत्यू झाला. ही कारवाई बुधवारी पहाटे वायगाव चौरस्त्यावर करण्यात आली. यातील तीन आरोपींनी पळ काढला तर ट्रक जप्त करण्यात आला.
ट्रक क्र. एमएच ३६ एफ ३३५८ ने गोंदिया, भंडारा येथील जनावरे कत्तलखान्याकडे नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून वडनेर, हिंगणघाट, अल्लीपूर व देवळी पोलिसांनी नाकाबंदी केली; पण ट्रक चालकाने सर्व नाकेबंदी तोडून पळ काढला. यामुळे तीनही ठाण्याच्या पोलिसांनी पाठलाग केला. हा सिनेस्टाईल प्रकार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू होता. यानंतर देवळी पोलिसांनीही धोत्रा चौरस्त्यापासून ट्रकचा पाठलाग केला. वायगाव (नि) चौरस्ता येथे नाकाबंदी असल्याने ट्रकने वेगातच वळण घेतले. यामुळे ट्रक पलटी झाला. यावेळी संधी साधत तीन आरोपींनी पळ काढला.
उलटलेल्या ट्रकमध्ये ३४ गाई व बैल होते. यातील दोन गुरांचा मृत्यू झाला तर ३२ गुरे पोलिसांनी ताब्यात घेतली. यातील १० गुरांना गंभीर तर २२ गुरांना किरकोळ दुखापत झाल्याचे दिसून आले. पोलिसांद्वारे सर्व गाई व बैल अड़ेगाव येथील गो-शाळेत पाठविण्यात आली. या प्रकरणाचा पूढील तपास देवळी पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन दराडे करीत आहेत.