सावधान; कोरोना पसरवितोय पाळेमुळे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:00 AM2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:53+5:30

आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एका मृत महिलेचा आणि वाशीम जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात उपचारासाठी आलेल्या एका व्यक्तीचा समावेश होता. हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हिवरा तांडासह परिसरातील १३ गावे कंटेन्मेंट व बफर झोन तयार करून सील करण्यात आली आहेत.

Caution; Corona is spreading ... | सावधान; कोरोना पसरवितोय पाळेमुळे...

सावधान; कोरोना पसरवितोय पाळेमुळे...

googlenewsNext
ठळक मुद्देआणखी चौघे पॉझिटिव्ह : आर्वीसह कारंजा तालुक्यातील १८ गावे सील, नव्या रुग्णांमध्ये अडीच वर्षीय मुलाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रविवार १० मे पासून सतत सात दिवस कोरोनाचा एकही रुग्ण न आढळलेल्या वर्धा जिल्ह्यात सोमवारी नवीन चार कोरोना रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडली असून कंटेन्मेंट व बफर झोन तयार करून आर्वीसह कारंजा (घा.) तालुक्यातील एकूण १८ गावे सील करण्यात आली आहेत. आढळलेल्या नवीन रुग्णात एका अडीच वर्षीय मुलाचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
रविवार १० मे रोजी वर्धा जिल्ह्यात दोन कोरोना रुग्णाची नोंद घेण्यात आली होती. यात आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एका मृत महिलेचा आणि वाशीम जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात उपचारासाठी आलेल्या एका व्यक्तीचा समावेश होता. हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हिवरा तांडासह परिसरातील १३ गावे कंटेन्मेंट व बफर झोन तयार करून सील करण्यात आली आहेत. तर रविवारी रात्री उशीरा आरोग्य विभागाला काही व्यक्तींचे अहवाल प्राप्त झालेत. यात आर्वी तालुक्यातील जामखुटा येथील तीन व्यक्ती तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथून वर्धा जिल्ह्यात उपचारासाठी आलेली एक तरुणी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. त्यानंतर मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास या चारही रुग्णांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून जामखुटासह परिसरातील १८ गावे सील करण्यात आली आहेत.

जिल्हा परिषदेची शाळा केली निर्जंतूक
कोरोना बाधित क्षेत्र असलेल्या नवी मुंबई भागातून वर्धा जिल्ह्यातील जामखुटा येथे आलेल्या चार व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून जामखुटा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला. या चार व्यक्तींपैकी तिघे व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सदर शाळेला निर्जंतूक करण्यात आले आहे.

१७ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीला
जामखुटा प्रकरणी सहा तर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या युवतीच्या निकट संपर्कात आलेल्या चार तसेच डॉक्टर, वॉर्ड बॉय आणि नर्स आणि सात व्यक्ती अशा एकूण १७ व्यक्तींचे स्त्राव नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
कोरोना बाधित रुग्णांना जेवन पुरविणारे त्यांचे आई-वडिल, महिलेचा पती, आणि इतर निकट संपर्कात आलेल्या अशा सहा व्यक्तींना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे. तसेच ‘लो-रिस्क’ मध्ये आलेल्या सात व्यक्तींना हैबतपूर येथे कोविड केअर सेंटरला विलगिकरणात ठेवले आहे.

गर्दीच्या सात ठिकाणी सीसीटीव्हीने पाळत
सील करण्यात आलेल्या गावांमध्ये ज्या ठिकाणी नेहमी नागरिकांची गर्दी होते ते सात ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी सीसीटिव्ह लावण्यात आला आहे. शिवाय एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावणारे पोलीस सीसीटिव्हीच्या माध्यमातून गावातील छोट्या छोट्या गोष्टींवर नजर ठेऊन आहेत. शिवाय ड्रोन कॅमेऱ्यानेही नागरिकांवर पाळत ठेवली जात आहे. या भागात वेळोवेळी पोलिसांकडून गस्त घालून नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले जात आहे.

ही गावे केली सील
आर्वी तालुक्यातील जामखुटा गावाच्या ३ किमी परिघातील हिवरा, हिवरा तांडा, बेल्हारा, बेल्हारा तांडा, हर्राशी, राजणी, पाचोड, चिंचोली, टिटोणा, बेढोणा, वाढोणा तर ७ किमी परिघातील अंबाझरी, गुमगाव, लहादेवी, पांजरा, आडेगाव आणि कारंजा तालुक्यातील धामकुंड, चोपन ही गावे कंटेन्मेंट व बफर झोन तयार करून सील करण्यात आली आहेत.

विनापरवानगी एन्ट्री?
नवी मुंबई येथून आर्वी तालुक्यातील जामखुटा येथे दाखल झालेले हे चार व्यक्ती कुठलीही परवानगी घेऊन वर्धा जिल्ह्यात दाखल झाले नसल्याचे आरोग्य विभागाच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनीही सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी अंती वास्तव पुढे येणार आहे.

Web Title: Caution; Corona is spreading ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.