सावधान...! वर्ध्यात कोरोनाची ‘एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 05:00 AM2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:00:25+5:30
मृत महिलेचा परदेशी प्रवासाचा इतिहास नाही. त्यामुळे ती कुणाकुणाच्या संपर्कात आली, तसेच तिच्या कुटुंबातील व्यक्ती कुणाच्या संपर्कात आल्या याचा शोध घेणे सुरु आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्त्राव घेण्यात येणार असून त्यांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात येत आहे. तसेच १४ दिवसांच्या कालावधीत संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना गृह विलगिकरण करण्यात येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रीनझोन असलेल्या वर्ध्यातही आता कोरोनाने एट्री केल्यामुळे आता प्रत्येकाचीच जबाबदारी वाढली आहे. आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) या गावातील एका ३६ वर्षीय महिलेचा मृत्यूपश्चात तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना सुरु केल्या. हिवरा या गावापासून तीन किलो मीटर अंतरावरील सात गावांच्या सीमा सील केल्या असून आता या महिलेच्या संपर्कात आलेल्यांची माहिती गोळा करुन त्यांचे स्वॅब नमुने तपासणी करिता पाठविण्यात येणार आहे. यासोबतच त्या सर्वांचे संस्थात्मक अलगीकरण केले जात असून जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा व पोलीस प्रशासन या गावात तळ ठाकून उपाययोजना राबवित आहे. जिल्ह्याला कोरोनापासून मुक्त ठेवण्याकरिता जिल्हा प्रशासनाने दिवसरात्र परिश्रम घेत आहे. तरीही कोरोनाने जिल्ह्यात एका महिलेच्या माध्यमातून शिरकाव केल्याने प्रशासनाकडूनही कठोर अंमलबजाणी केली जात आहे.
‘ती’ रेड झोनमध्ये करायची प्रवास
मृत महिलेसह पतीचा गावठी दारुविक्रीचा व्यवसाय आहे. सध्या गावठी दारुला मागणी वाढल्याने मृत महिला ही चारचाकी वाहनाने नागपूर, वाडी यासह इतर गावामध्ये दारुचा पुरवठा करीत असल्याचे सांगितले जात आहे. गावातही दारु पिणाऱ्यांची गर्दी होत असल्याने आता तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा शोध घेण्याचे प्रशासनापुढे मोठे आवाहन आहे. या परिसरात वनविभागाचे काम सुरु असल्याने त्यांचाही संपर्क आल्याने वनमजूर व कर्मचारी अशा सहा जणांना होम क्वारंटाईन केल्याचे सांगण्यात आले आहे.
मृत महिलेचा परदेशी प्रवासाचा इतिहास नाही. त्यामुळे ती कुणाकुणाच्या संपर्कात आली, तसेच तिच्या कुटुंबातील व्यक्ती कुणाच्या संपर्कात आल्या याचा शोध घेणे सुरु आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्त्राव घेण्यात येणार असून त्यांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात येत आहे. तसेच १४ दिवसांच्या कालावधीत संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना गृह विलगिकरण करण्यात येईल.
डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, वर्धा
आर्वी तालुक्यात ही पहिलीच घटना असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हिवरा (तांडा) हे गाव सील करण्यात आले. हिवरा तांडा येथे आठ वेगवेगळे पथक तयार करण्यात आले असून तीन किलोमीटर अंतरातील परिसर सील करण्यात आलेला आहे. आता नागरिकांनीही आपली खबरदारी घेण्याची गरज आहे.
विद्यासागर चव्हाण, तहसीलदार, आर्वी
माहिती मिळताच बैठक बोलावून महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची आठ पथके तयार केली. लगेच हिवरा (तांडा) या गावात जाऊन उपाययोजना सुरु केल्या असून परिसरातील हिवरा, जामखुटा, राजनी, हर्रासी, बेल्हारा, बेल्हारा (तांडा),थार, पाचोड या गावांमध्ये वाहतुकीकरिता प्रतिबंध घालण्यात आला आहे.
हरीश धार्मिक, उपविभागीय अधिकारी, आर्वी.