‘शुभांगी उईके’ हत्या प्रकरणाचा तपास आता करणार ‘सीबीआय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:24 AM2018-10-20T00:24:02+5:302018-10-20T00:24:51+5:30

सेलू तालुक्यातील आजनगावच्या शुभांगी पिलाजी उईके (१८) हिचा दहेगाव (गोसावी) परिसरातील रेल्वे रुळावर निर्वस्त्र स्थितीत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला.

CBI to investigate 'Shubhangi Uike' murder case | ‘शुभांगी उईके’ हत्या प्रकरणाचा तपास आता करणार ‘सीबीआय’

‘शुभांगी उईके’ हत्या प्रकरणाचा तपास आता करणार ‘सीबीआय’

googlenewsNext
ठळक मुद्देअनुसूचित जमाती आयोगाने केली शिफारस : अवचित सयाम यांच्या पाठपुराव्याचे फलित

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेलू तालुक्यातील आजनगावच्या शुभांगी पिलाजी उईके (१८) हिचा दहेगाव (गोसावी) परिसरातील रेल्वे रुळावर निर्वस्त्र स्थितीत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. समाजबांधवानी ही आत्महत्या नसून बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करीत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे सीबीआय चौकशीची मागणी केली. याबाबत आदिवासी नेते अवचित सयाम यांनी पाठपुरावा सुरुच ठेवल्याने राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोगाने मागणी मान्य करुन स्थानिक प्रशासन व गृह विभाग, महाराष्ट्र शासनाद्वारे केंद्रीय गृह विभागाकडे सीबीआय चौकशीसाठी शिफारस करण्याचे आदेश दिलेत.
मृतक शुभांगी उईके हिच्यावर दहेगांव (गो.) परिसरात १९ मार्चला बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकुन देण्यात आला. या प्रकरणी पोलीसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. यामुळे संतप्त समाज बांधवांनी मोर्चा काढून दोषींवर कठोर कारवाईसह सीबीआय चौकशीची मागणी केली. आदिवासी नेते अवचित सयाम यांनी पाठपुरावा सुरु ठेवल्याने राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, न्यु दिल्लीच्या सदस्या माया इवनाते व आयोगाचे अनुसंधान अधिकारी वाय.के.बंसल यांनी वर्ध्यात येऊन मृत शुभांगीच्या आई-वडीलांची भेट घेतली. घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करुन विविध सामाजिक संघटनांशी चर्चा केली. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सबंधित अधिकारी आणि समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांंसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनाही या चौकशीत अनेक त्रुटी आढळून आल्या. पोलिसांनी आपल्या चूका झाकण्यासाठी या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरुप देऊन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यामुळे आरोपी विवेक लोटे हा जामिनावर बाहेर असल्याचा आरोप सयाम यांनी केला आहे. हे प्रकरण संशयास्पद असल्याने बलात्कार करुन हत्या केली; या आरोपाखाली चौकशी व्हावी व मृत मुलीच्या पालकांना मदत मिळावी म्हणून राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने शिफारस करुन सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहे.

अशी आहे आयोगाची शिफारस
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर, उप कार्यालय वर्धाच्या रिपोर्टनुसार पीडित परिवाराला आदिवासी विकास विभाग,महाराष्ट्र शासनद्वारा न्युक्लिअर बजेट अंतर्गत आपातकालिन परिस्थितीत ५० हजार रुपयाचे आर्थिक सहाय्यता देण्याची कारवाई करावी. ह्या संबंधाने तात्काळ १० हजार रुपयाची आर्थिक मदत शासनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी. पीडित परिवार भूमीहीन असल्याने आदिवासी विकास विभागाने स्वाभीमान सशक्तीकरण योजनेंतर्गत शेती उपलब्ध झाल्यावर २ एकर बागायती किंवा ४ एकर जिरायती जमीन द्यावी. शिवाय शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ द्यावा. महिला व बाल कल्याण विभागातर्फे आवश्यक आर्थिक मदत देण्याची शिफारस आहे.

या बलात्कार व हत्या प्रकरणात विविध संघटनाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे, निवेदने, कँडम मार्च, मूक मोर्चे व आक्रोश मोर्चे काढून मृतक शुभांगीला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न झाले. अखेर राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, न्यू दिल्ली यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी पूर्ण केली. स्थानिक प्रशासन व गृह विभाग महाराष्ट्र शासनद्वारा केंद्रीय गृह विभागाकडे सीबीआय चौकशीसाठी शिफारीश करण्याचे आदेश दिले. हा निर्णय स्वागतार्ह आहे. विवेक लोटेचा जामिन नामंजूर करावा.
- अवचित सयाम, आदिवासी नेते.

Web Title: CBI to investigate 'Shubhangi Uike' murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.