सीबीएसईत मुलींची बाजी
By Admin | Published: May 29, 2017 01:01 AM2017-05-29T01:01:16+5:302017-05-29T01:01:16+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा इयत्ता बारावीचा आॅनलाईन निकाल रविवारी जाहीर झाला.
बारावीचा निकाल : स्रेहल देशकर प्रथम; मनाली डायगव्हाने द्वितीय
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा इयत्ता बारावीचा आॅनलाईन निकाल रविवारी जाहीर झाला. यात जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिंनी स्रेहल देशकर हिने ९५.८ टक्के गुण घेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर भुगाव येथील लॉएड्स विद्या निकेतनची मनाली डायगव्हाणे ९५.४ टक्के घेत द्वितीय स्थानावर राहिली. या निकालात निकालातही मुलींचेच वर्चस्व दिसून आले. जिल्ह्यातील सीबीएसई माध्यमांच्या पाचही शाळांचा निकाल ९० टक्क्यांच्यावर आहे.
केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात आली. यातील चैन्नई विभागाचा निकाल आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला. मानव संसाधन विकास मंत्रालयद्वारा संचालित जवाहर नवोदय विद्यालय, सेलूकाटे, लॉएड्स विद्या निकेतन, भूगाव आणि पुलगाव येथील केंद्रीय विद्यालयाचा निकाल शंभर टक्के आहे. तर अल्फोन्सा स्कूलचा निकाल ९६ टक्के लागला. गांधी सिटी पब्लीक स्कूल वगळता जिल्ह्यातून १५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा समावेश आहे.
येथील नवोदय विद्यालयातून यंदाच्या सत्रात ४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ते सर्वच या परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. भुगाव येथील लॉएड्स विद्यानिकेतन मधून विज्ञान विभागातून ४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेत असलेल्या वाणिज्य शाखेत एकूण १४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील सर्वच विद्यार्थी प्राविण्य गुणासह उत्तीर्ण झाल्याची माहिती शाळेच्यावतीने देण्यात आली. तर अल्फोन्सा विद्यानिकेतनचा विद्यालयातून आदिती डबले प्रथम आली. या शाळेतून ३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या बारावीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये दिसून आली. या निकालामुळे विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वाणिज्य शाखेतून अक्षरा प्रथम
बारावी सीबीएसईच्या वाणिज्य शाखेतून अक्षरा केला जिल्ह्यातून प्रथम आली आहे. तिने ९४ टक्के गुण प्राप्त केले. ती भवन्स विद्या निकेतन येथील विद्यार्थिनी आहे. याच विद्यालयाच्या सलोनी पोद्दार हिने ९२.८ टक्के मिळवत द्वितीय तर पराग जोतवाणी याने ९२.६ टक्के मिळवत तृतीय स्थान मिळविले.
कल्याणी मराठी विषयात अव्वल
जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटेची विद्यार्थिनी कल्याणी जोशी हिने मराठी विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवत पुणे विभागातून या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केले आहे. याच शाळेच्या अमर कौंडण्यपूरे याने इंग्रजीत ९९ गुण मिळविले तर जिल्ह्यात प्रथम आलेल्या स्रेहल देशकर हिने जीवशास्त्र विषयात ९९ गुण मिळविले आहे.