वर्धा शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सहा महिन्यांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 05:00 AM2020-10-18T05:00:00+5:302020-10-18T05:00:02+5:30
शहरातील बजाज चौक, आर्वी नाका चौक, छत्रपती शिवाजी चौक, दादाजी धुनिवाले चौक, सिव्हिल लाइन परिसर आदी वर्दळीच्या ठिकाणी कोटी रुपयांच्या जवळपास निधी खर्च करून हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. एप्रिल महिन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाला आग लागल्यानंतर तांत्रिक बिघाड निर्माण झाला. तेव्हापासून सीसीटीव्ही कॅमेरे बंदच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी शहरातील विविध प्रमुख चौकांत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सद्यस्थितीत शोभेची वस्तू ठरत आहेत. मागील सहा महिन्यांपासून शहरात या यंत्रणेने पूर्णत: डोळे मिटलेले असल्याचे चित्र आहे.
नगरपालिकेच्या वतीने नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत २०१४-१५ मध्ये चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीमधून शहरातील प्रमुख चौकांत कॅमेरे लावण्याकरिता एक कोटींच्या जवळपास निधीची तरतूद करण्यात आली होती. तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर कंत्राटदाराला हे कॅमेरे लावण्याचा कंत्राट देण्यात आला होता. महत्त्वपूर्ण विविध चौकात ४८ वर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. देखभाल दुरुस्तीची व्यवस्थाही करण्यात आली. या कॅमेऱ्यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आला. या कक्षात लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर शहरातील विविध भागातील फुटेज दिसू लागले. यातून संपूर्ण शहरावर तिसºया डोळ्यातून लक्ष ठेवणे सुरू झाले. पोलीस प्रशासनाला आरोपींचा शोध घेण्यास मोलाची मदत होऊ लागली.
मात्र, एप्रिल महिन्यात नियंत्रण कक्षाला लागलेल्या आगीमुळे ही यंत्रणा बंद झाली. आजतागायत ही यंत्रणा डोळे मिटलेलीच आहे. सहा महिन्यांपासून ही यंत्रणा बंद असताना ती सुरू करण्याच्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासन, पोलीस विभागाकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे शोभेचे ठरत असून सोनसाखळी पळविणे, मुलींची छेडखानी, रॅश ड्रायव्हिंग आदी प्रकाराला ऊत आलेला आहे. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटूनही सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात न आल्याने यावर खर्च झालेला निधीही पाण्यात जातो की काय, या शनकेला वाव मिळत आहे.
शहरातील या प्रमुख चौकांत लागले होते सीसीटीव्ही कॅमेरे
शहरातील बजाज चौक, आर्वी नाका चौक, छत्रपती शिवाजी चौक, दादाजी धुनिवाले चौक, सिव्हिल लाइन परिसर आदी वर्दळीच्या ठिकाणी कोटी रुपयांच्या जवळपास निधी खर्च करून हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. एप्रिल महिन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाला आग लागल्यानंतर तांत्रिक बिघाड निर्माण झाला. तेव्हापासून सीसीटीव्ही कॅमेरे बंदच आहे.
उद्घोषणा देणेही झाले बंद
सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासोबतच महत्त्वाच्या प्रमुख चौकात उद्घोषणा करण्याकरिता ध्वनिक्षेपक लावण्यात आले होते. वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यास संबंधित वाहनमालकांना नियंत्रण कक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना दिल्या जात होत्या. ही यंत्रणाही वर्षभरापासून बंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ध्वनिक्षेपकही शोभेचेच ठरत आहेत.