भारावलेल्या क्षणांनी ‘स्मृतितरंग’ कलामहोत्सव साजरा
By admin | Published: February 11, 2017 12:43 AM2017-02-11T00:43:45+5:302017-02-11T00:43:45+5:30
नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य असे वैविध्यपूर्ण योगदान देणारे बिरादरी कलावृंदाचे संस्थापक योगेंद्र कावळे यांना पहिल्या स्मृतिदिनी
बिरादरांच्या विविध कलाकृती : अनेकांनी सादर केली देशभक्तीपर गिते
वर्धा : नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य असे वैविध्यपूर्ण योगदान देणारे बिरादरी कलावृंदाचे संस्थापक योगेंद्र कावळे यांना पहिल्या स्मृतिदिनी बिरादरांनी विविध कलांच्या सादरीकरणातून आदरांजली अर्पण केली. स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित या ‘स्मृतितरंग’ कलामहोत्सवाने उपस्थितांना निखळ आनंद देतानाच भावविभोरही केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सत्यनारायण बजाज जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रदीप बजाज यांच्या हस्ते व सचिव गौरीशंकर टिबडेवाल, वाचन विकास प्रकल्पाचे कार्यवाह डॉ. गजानन कोटेवार, बिरादरी निर्मित ‘तीर्थधारा’ या नृत्यनाटिकेत महात्मा गांधींची भूमिका करणारे सुनील रहाटे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीता कावळे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले.
‘स्मृतितरंग’ कलामहोत्सवाची सुरूवात स्वामिनी सुभेदार हिने गायलेल्या ‘तुम आशा, विश्वास हमारे’ या प्रार्थनागीताने झाली. त्यापाठोपाठ, अनघा व विश्वास रानडे यांनी तुम गगनके चंद्रमा, रहे ना रहे हम महका करेंगे, सुनील रहाटे यांनी जीवाभावाचा मितवा, शशीकांत बागडदे यांनी वो शाम कुठ अजीब थी, जब जब बहार आयी और फुल मुस्कुराये, डॉ. भैरवी काळे यांनी रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे, मनीष खडतकर यांनी दिये जलते है, फिर वही रात तर अर्चना देव झाल्टे यांनी रसिका कैसे गाऊ गीत ही गाणी सादर केली. आशुतोष फुंडे या युवा कलावंताने सतारीवर राग यमन सादर केला. शुभम सहारे आणि चमूने विविध समूह नृत्यप्रकार सादर केले. यासोबतच, डॉ. सोनाली नागपूरकर भगत यांनी भारतीय व पाश्चात्य नृत्याचे फ्युजन तर दत्ता भोंबे यांनी बैठकीची लावणी सादर केली. कार्यक्रमाची सांगता अजय हेडाऊ यांच्या ‘हावऱ्या मना ऐके ना’ या राष्ट्रसंताच्या भजनाने झाली. गायकांना नरेंद्र माहुलकर, प्रवीण चहारे, राजेंद्र झाडे, मंगेश परसोडकर, अनिल दाऊतखानी, वसंत भट, सुमेध कांबळे यांनी संगीतसाथ केली.
कार्यक्रमात योगेंद्र कावळे यांच्या आठवणींना उजाळा देणारा स्मृतिपटही दाखविण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप करताना बिरादरी कलावृंदाच्या सर्व कलावंतांनी रंगमंचावर येऊन उपस्थितांना अभिवदन केले. यावेळी, सभागृहात ‘तीर्थधारा’ नृत्यनाटिकेतील ‘एततधारा तीर्थम्’ हे अंतिम नमनगीताचे स्वर घुमत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्मिता कावळे यांनी केले. संचालन ईशान कावळे यांनी तर आभार संजय इंगळे तिगावकर यांनी मानले. सर्व कलावंताना कावळे परिवाराद्वारे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.(प्रतिनिधी)