सिमेंट मार्गाची दैनावस्था
By admin | Published: June 12, 2017 01:48 AM2017-06-12T01:48:42+5:302017-06-12T01:48:42+5:30
गावातील मुख्य रस्ता व पालखी दिंडी मार्ग म्हणून ओळख असलेल्या सिमेंट रस्त्याची सध्या दैनावस्था झाली आहे.
रस्ता नूतनीकरणाची गरज : पावसाळ्यात येते तळ्याचे स्वरूप
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : गावातील मुख्य रस्ता व पालखी दिंडी मार्ग म्हणून ओळख असलेल्या सिमेंट रस्त्याची सध्या दैनावस्था झाली आहे. त्याची दुरूस्ती करणे क्रमप्राप्त असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात या मार्गाला तळ्याचे स्वरूप येते. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन योग्य कार्यवाहीची मागणी आहे.
प्रतिपंढरी म्हणून ओळख असलेल्या गावात रामनवमी यात्रेला तर संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव प्रसंगी हजारो भाविकांच्या उपस्थितीत निघणारा पालखी सोहळा ज्या मार्गाने जाते तो ग्रा.पं.कार्यालय ते जगनाडे मंदिर चौक व विठ्ठल रूखमाई मंदिर या रस्त्याचे २० वर्षांपूर्वी सिमेंटीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून त्या रस्त्याचे नुतणीकरण केले नसल्याने जागोजागी खड्डे पडले आहे. तर रस्त्याच्या दोन्ही बाजू रस्त्यापेक्षा उंच केल्याने पावसाचे पाणी नालीत वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. थोडा जरी पाऊस आला तरी या खड्ड्यात पाणी साचते. पावसाळ्यात या रस्त्याला तळ्याचे स्वरूप येते. परिणामी, नागरिकांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सदर रस्त्याचे नव्याने सिमेंटीकरण करण्यासाठी शासकीय निधी मिळाल्याचा गवगवा झाला होता. याकडे खासदार, आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून या रस्त्याचे सिमेंटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास प्रतीपंढरीतील हा पालखी मार्ग खड्डेमय व जलमय राहणार नाही, अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे. ग्रा.पं. भवन बांधकामासाठी कर्ज रूपात निधी मिळाला तर असंख्य भाविकांचे पदकमल ज्या रस्त्याला लागतात. त्या रस्त्याच्या नुतनीकरणासही निधी घ्यावा, अशी मागणी आहे. पावसाळ्याच्या दिवसात या मार्गावर चिखल तयार होतो. बऱ्याच दिवस रस्त्यावरील पाणी वाहून जात नाही. वेळोवेळी पाऊस झाल्यास रस्त्याला तळ्याचे स्वरूप येते. परिणामी, रस्त्यावरील खड्ड्यांचाही अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे मोठ्या अपघाताची भीती राहत असल्याने योग्य कार्यवाहीची गरज आहे.
अपघाताची भीती
ग्रामपंचायत कार्यालय ते विठ्ठल रुखमाई मंदिर दरम्यानच्या सिमेंट रस्त्यावर पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचते. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पाण्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा सहन अंदाज येत नाही. त्यामुळे मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्याचप्रमाणे या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. वाहन अनियंत्रित होण्याची भीती नेहमीच असते. नागरिकांसह वाहनचालकांची समस्या लक्षात घेता योग्य कार्यवाहीची मागणी आहे.